भारतातील प्रख्यात क्लासिकल डान्सर आणि अभिनेत्री सितारा देवी यांच्या बायोपिकची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. ८ नोव्हेंबर १९२० रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या सितारा देवी यांच्या १०१व्या जन्मदिनी त्यांच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. सितारा देवी या भारतातील प्रख्यात क्लासिकल डान्सर होत्या, ज्यांनी आपल्या नृत्यकौशल्याच्या जोरावर देशातच नव्हे तर जगभरात नाव कमावले. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यातही आले होते.
दुर्दैवाने सितारा देवी आज या जगात नाहीत, परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले होते; मात्र असे असले, तरी त्यांनी आपले आयुष्य हे आपल्या अटींवर जगले होते. सितारा देवी यांचा बायोपिक बनणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा चित्रपट निर्माता राज सी. आनंद यांनी दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सितारा देवी यांची कथा मोठ्या पडद्यावर जीवंत साकारण्याची संधी मिळत असल्याने आम्ही खूप खुश आणि उत्साहित आहोत. आम्हाला खात्री आहे की, त्यांची कथा पडद्यावर पाहणे खूप शानदार ठरेल. या चित्रपटाची स्टारकास्ट आणि त्याच्या दिग्दर्शकाची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. तुर्तास त्यांच्या आयुष्याशी निगडीत सर्व प्रकारचे तथ्य शोधून काढण्यासाठी एका टीमने आपले काम सुरू केले आहे.