ठळक बातम्या

पौगंडावस्थेतील मुस्लीम मुलगी स्वत:च्या मर्जीने करू शकते विवाह!

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निकाल
चंदिगड – पौगंडावस्थेत प्रवेश केल्यानंतर मुस्लीम मुलगी स्वत:च्या मर्जीने कोणाशीही विवाह करून शकते, असा निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. कुटुंब आणि नातेवाईकांच्या विरोधात जाऊन हिंदू मुलाशी लग्न करणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुस्लीम मुलीला आणि तिच्या पतीला सुरक्षा पुरवण्याचे आदेश देखील न्यायालयाने यावेळी दिले आहेत. मुस्लीम मुलीने पौगंडावस्थेत प्रवेश केल्यानंतर, तिला तिचा जोडीदार निवडण्याचा हक्क आहे, यामध्ये तिचे आई-वडील किंवा नातेवाईक हस्तक्षेप करू शकत नाहीत, असेही न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, न्या. हरनरेश सिंग गिल यांनी निकाल देताना म्हटले की, मुस्लीम मुलीचा विवाह मुस्लीम पर्सनल लॉद्वारे केला जातो, हा कायदा स्पष्ट आहे. सर दिनशाह फरदुनजी मुल्ला यांच्या ‘प्रिन्सिपल्स ऑफ मोहम्मदन लॉ’ या पुस्तकातील कलम १९५ नुसार, याचिकाकर्ती मुलगी १७ वर्षीय असल्याने ती तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्यास सक्षम आहे, तसेच याचिकाकर्ता नवऱ्या मुलाचे वय देखील ३३ वर्षे आहे. त्यामुळे याचिकाकर्ती मुलगी मुस्लीम पर्सनल लॉनुसार विवाहयोग्य वयाची आहे.
न्या. गिल पुढे म्हणाले, केवळ याचिकाकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले म्हणून त्यांना संविधानातील मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवता येणार नाही. याबाबतची भीती याचिकाकर्त्यांच्या मनातून घालवण्याची गरज आहे. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, मुस्लीम पर्सनल लॉनुसार वयाच्या १५व्या वर्षी एखादी व्यक्ती प्रौढ बनते. त्यामुळे मुस्लीम मुलगा किंवा मुस्लीम मुलगी पौगंडावस्थेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही व्यक्तीशी लग्न करू शकतात. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना यामध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी पुढे सांगितले की, सर दिनशाह फरदुनजी मुल्ला यांच्या ‘प्रिन्सिपल्स ऑफ मोहम्मदन लॉ’ या पुस्तकातील कलम १९५ मध्ये लग्नाविषयी भाष्य करण्यात आले आहे. त्यानुसार निरोगी बुद्धीचा प्रत्येक मुस्लीम व्यक्ती पौगंडावस्थेत विवाह करू शकतो.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …