पेट्रोल, डिझेल गाड्यांवर बंदी नाही – गडकरींचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली – वायु प्रदुषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशातील काही प्रमुख शहरांतील हवा प्रदुषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दिवाळीच्या काळात दिल्लीमधील हवेचा एअर क्वॉलिटी इंडेक्स हा तब्बल चारशेपेक्षाही पुढे गेला होता. अशा परिस्थितीमध्ये वाढत्या वायु प्रदुषणाला आळा घालण्यासाठी पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घातली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे; मात्र पेट्रोल, डिझेलच्या वाहनांवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार नाही, परंतु हवा प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. ते इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
पुढे बोलताना गडकरी यांनी म्हटले आहे की, देशात वाहनामुळे हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. ते कमी करण्यासाठी आता इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्यासाठी अनेक कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे, तसेच पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल निर्मितीवर देखील भर देण्यात आला आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की, पेट्रोल-डिझेलच्या वाहनांवर बंदी आणली जाईल, पेट्रोल-डिझेलच्या वाहनांची निर्मिती सुरूच राहणार असल्याचे यावेळी गडकरींनी सांगितले.
दरम्यान, गडकरी यांच्या हस्ते मारुती सुझुकीच्या स्क्रॅपिंग सेंटरचे उद्घाटनदेखील करण्यात आले. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, मारुतीने सुरू केलेले हे स्क्रॅपिंग सेंटर देशातील पहिले स्क्रॅपिंग सेंटर आहे. केंद्राने नुकतीच स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर केली आहे. या पॉलिसीनुसार आपली जुनी वाहने स्क्रॅप करणाऱ्यांना नवे वाहन खरेसाठी प्रोहोत्साहनपर सूट देण्यात येईल. तसेच स्क्रॅपिंग सेंटरमुळे येणाऱ्या काळात दोन लाखांपेक्षा अधिक रोजगाराची निर्मिती होऊ शकते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …