पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचा नवा कर्णधार!

६५ वर्षांनी बदलला निर्णय
मेलबर्न – टीम पेन कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाची कसोटी नेतृत्वाची धुरा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याच्याकडे सोपवली आहे, तर उपकर्णधार म्हणून स्टिव्ह स्मिथ याची निवड करण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या इतिहासात तब्बल ६५ वर्षांनंतर संघाचे नेतृत्व एका गोलंदाजाकडे गेले आहे. महान वेगवान गोलंदाज रिची बेनो यांच्यानंतर तब्बल ६५ वर्षांनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व एका गोलंदाजांकडे आले आहे. पॅट कमिन्स हा ४७ वा ऑस्ट्रेलियन कर्णधार झाला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या ॲशेस मालिकेपासून पॅट कमिन्स कर्णधारपद तर स्टिव्ह स्मिथ उपकर्णधारपद साभांळणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पाच सदस्यीय निवड समितीने कमिन्स आणि स्मिथ यांची निवड केली. एका अहवालानुसार, ऑस्ट्रेलियन मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी स्टीव्ह स्मिथला उपकर्णधार आणि पॅट कमिन्सला कर्णधार म्हणून निवडण्याची सूचना केली होती. त्यानुसार, या स्मिथ-कमिन्स यांच्या निवडीवर विचार करण्यात आल्याचे समजते.
महिला सहकाऱ्याला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने नुकताच राजीनामा दिला. त्यामुळे आगामी ॲशेस मालिकेसाठी कर्णधारपद कुणाकडे जाणार याची चर्चा होती. २८ वर्षांच्या पॅट कमिन्सने आतापर्यंत ३४ कसोटी सामन्यांत २१ च्या सरासरीने १६४ विकेट्स घेतल्या आहेत. पॅट कमिन्स आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. आघाडीचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ याआधी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार होता, पण २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंगनंतर त्याचे कर्णधारपद काढून घेतले गेले होते. त्यानंतर आता त्याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …