१९८४ साली अमिताभ बच्चन यांचा इन्कलाब हा चित्रपट आला होता. राजकारण्यांच्या विळख्यात अडकलेला एक पोलीस अधिकारी आणि त्याने राजकारण्यांना शिकवलेला धडा, असा विषय या चित्रपटात होता. राजकारण्यांच्या जाळ्यात प्रामाणिक पोलीस अधिकारी अडकल्यावर त्यावेळी अमिताभ बच्चनचे एक गाणे अत्यंत गाजले होते. ते म्हणजे ‘अभिमन्यू चक्रव्यूह में फस गया हैं तू’. आज समीर वानखेडे ज्याप्रमाणे अडकत चालले आहेत, त्यावरून पुन्हा एकदा इन्कलाबची स्टोरी आपण पाहत आहोत काय?, असा प्रश्न पडतो. त्यामध्ये कादरखानचे डायलॉग गाजले होते. सभ्यतेचा बुरखा पांघरलेल्या परंतु प्रत्यक्षात राजकारणी आणि गुन्हेगारांशी संबंधित असलेल्या मास्टरजी कादरखान अमिताभ जाळ्यात अडकल्यानंतर आणि त्याचा खरा चेहरा समोर आल्यावर म्हणतो की, ‘मैने तुझे भगवान समजा था, लेकीन तू तो सैतानसे भी जादा हैवान निकले.’ आता असा डायलॉग समीर वानखेडे कोणाला म्हणतात हे पाहावे लागेल.
एका जाहीर सभेत मंत्री नवाब मलिक भाषण करतात की, वानखेडेला तुरुंगात बसवणार, एक वर्षाच्या आत त्याला तुरुंगात बसवणार, त्याला नोकरीवरून हाकलणार वगैरे वगैरे… आणि २४ तास उलटायच्या आत कालचा हीरो असलेले वानखेडे एकाएकी आरोपीच्या पिंजºयात येतात. ड्रग्जविरोधात मोहीम आखणारे समीर वानखेडेंवर एकाएकी आरोप सुरू होतात हा काही योगायोग असू शकत नाही. गेला महिनाभर नवाब मलिक एकाकी झुंज वानखेडेंविरोधात देत असताना तशी पक्ष म्हणून त्यांची कोणी पाठराखण करत नाहीत, पण या कारवाईत प्रमुख भूमिका असलेल्या वानखेडेंविरोधात अचानक तक्रारी येतात हे पाहिल्यावर एखाद्या हिंदी चित्रपटातील नवा ट्विस्ट आला आहे, असेच म्हणावे लागेल.
एनसीबीमध्ये चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे त्याची चौकशी करा, अशी मागणी नवाब मलिक यांनी सातत्याने केली आहे. एनसीबीला गांजा आणि हर्बल तंबाखू यातील फरक कळत नाही, असेही नवाब मलिक म्हणतात. सापडलेला २०० किलो हा गांजा नव्हता, तर ती हर्बल तंबाखू होती, असा दावा त्यांनी केलेला आहे. पण तंबाखूचे व्यापारी नसताना एवढा मोठा तंबाखूचा साठा भले ती हर्बल असेल, तो कशासाठी केला होता हा प्रश्न मात्र कोणी विचारायचा नाही.
समीर वानखेडे यांनी २६ प्रकरणांमध्ये लोकांची फसवणूक केल्याचा दावा नवाब मलिकांनी केला आहे. एनसीबीच्या एका अधिकाºयाने निनावी पत्र लिहून आपल्याला ही माहिती दिल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. यात समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार आहे. त्यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. समीर यांचे पहिले लग्न इस्लामी पद्धतीने झाले होते. त्यांनी खोटे प्रमाणपत्र सादर करून एका मागासवर्गीयाचा हक्क हिसकावला आहे, असा आरोप मलिक यांनी केला आहे. अर्थात हे सगळे एखाद्याला उद्ध्वस्त करायच्या हेतूने केलेले आहे हे दिसते आहे. त्याने कुठला धर्म स्वीकारावा किंवा कुणाशी लग्न करावे याचा तपासाशी काही संबंध नाही, पण केवळ तू माझ्या जावायाला तुरुंगात बसवलेस ना आता मी तुला बसवणार ही वृत्ती यात दिसते आहे. मग तू निर्दोष असलास तरी तुला ही अग्निपरीक्षा द्यावी लागेल. प्रत्येक मनुष्य हा कुठे ना कुठेतरी चुकत असतो, पण त्याच्या जुन्या चुकीचा संबंध दुसºया प्रकरणाशी जोडणे हे चुकीचे असते. किंबहुना हा प्रकार म्हणजे पूर्वी रिनची जाहिरात होती. त्यात भला उसकी कमीज मेरी कमीज से ज्यादा सफेद कैसी वगैरे प्रश्न यायचे. तसलाच प्रकार हा होत आहे का?, असा प्रश्न पडतो. म्हणजे माझ्या जावयापेक्षा तू अधिक बदनाम कसा होशील हे मी पाहणार असे काहीसे यात दिसते आहे, पण इथे नवा इन्कलाब चित्रपट घडतो आहे की, काय अशी शंका येते.
भारतीय कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीने धर्म बदलल्यानंतर जात कायम राहात नाही, धर्म बदलला नसल्याचे वानखेडेंचे म्हणणे असेल, तर त्यांनी जन्मदाखला दाखवावा, असे मलिक यांनी म्हटले आहे. वानखेडे काही या खात्यात नोकरीला आज लागलेले नाहीत. नवाब मलिकही राजकारणात आज उतरलेले नाहीत, पण जोपर्यंत त्यांच्या जावयाची चौकशी वानखेडेंनी केली नव्हती, तोपर्यंत ते करत असलेले काम बरोबर होते. आज जर या प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावयाचा संबंध आला नसता तर त्यांनी वानखेडेंच्या जात, धर्म, जन्म दाखला याची मागणी केली असती का? हा पण प्रश्न यातून निर्माण होतो. समीर वानखेडे यांनी १००० कोटींपेक्षा जास्तीची वसुली केली आहे. मालदीवमध्येही वसुली झाली होती, असा दावा मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडेंनी कोणत्या अधिकाराने माझी मुलगी निलोफर मलिकचे कॉल रेकॉर्ड डिटेल्स मागितले? हा खाजगी हक्कांचा भंग नाही का, असा सवाल मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडे २ लोकांमार्फत फोन टॅप करतायत, इंटरसेप्ट करताय. एक मुंबईत, एक ठाण्यात आहे, असा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे. पण एखाद्या चौकशीसाठी आरोपीच्या पत्नीची चौकशी करू नये, असा काही नियम आहे काय हे पण स्पष्ट करण्याची जबाबदारी नवाब मलिक यांची आहे.
बॉलीवूड कलाकारांना ड्रग्ज केसमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम समीर वानखेडे करत आहेत. बॉलीवूडमधल्या दीपिका पदुकोण, करिश्मा प्रकाश, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, रिया चक्रवर्ती, सोविक चक्रवर्ती, अर्जुन रामपाल यांना अशा पद्धतीने फसवण्यात आले आहे. वकील अयाझ खान यांनी हे पैसे एकत्र करून दिले. अयाझ खान हा समीर वानखेडे यांचा मित्र असून, तो कोणत्याही अडथळ्याविना एनसीबीच्या कार्यालयात येऊ जाऊ शकतो. दर महिन्याला बॉलीवूड कलाकारांकडून पैसे मिळवून देतो. समीर वानखेडे बॉलीवूड कलाकाराला पकडतो, तेव्हा अयाझ खानला वकील करा असे सांगतो. असे अनेक आरोप नवाब मलिक यांनी केलेले आहेत, पण यातील सत्य आता समोर येणे गरजेचे आहे. एखाद्या प्रशासकीय सेवेतील, पोलीस सेवेतील अधिकाºयावर अशा प्रकारे आरोप होणे, ते सिद्ध होणे चांगले नाही. त्याहीपेक्षा प्रशासन आणि शासन यांच्यातील संघर्ष असा असावा हे लांछनास्पद आहे.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055