पुणे – पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी भरदिवसा गँगवारचा थरार पहायला मिळाला. दुपारी अडीचच्या सुमारास गोळीबाराची ही घटना घडली. गुन्हेगारांच्या दोन टोळ्यामध्ये झालेल्या गोळीबारामध्ये संतोष जगताप यांचा मृत्यू झाला तर संतोष जगताप यांनी जखमी अवस्थेत प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक हल्लेखोर ठार झाला.
प्राथमिक माहितीनुसार, वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे टोळीयुध्द भडकल्याची चर्चा आहे. भरदिवसा पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. संतोष जगताप दुपारी अडीचच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनईसमोर चर्चा करीत होते. रस्त्याच्या बाजूने आलेल्या चार ते पाच जणांनी संतोष जगताप व त्यांच्या अंगरक्षकावर घातक हत्याराने हल्ला चढविला तसेच गोळीबारही केला. या हल्ल्यात संतोष जगताप व त्यांचा अंगरक्षक गंभीर जखमी झाले तर जखमी अवस्थेत संतोष जगताप यांनी हल्लेखोरांना प्रत्युत्तर देताना गोळीबार केला. त्यात एक हल्लेखोर जागीच ठार झाला तर उर्वरित पळून जाण्यात यशस्वी ठरले.
या हल्ल्यानंतर संतोष जगताप यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तसेच शेजारील पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली होती. टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. नेमका गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, वाळुची ठेकेदारी आणि इतर काही कारणामुळे तसेच पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …