पुणे – युरोपमध्ये कोरोना महामारीने पुन्हा डोकेवर काढले असतानाच कधीकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरासाठी बुधवारचा दिवस मोठा दिलासा देणारा ठरला, कारण जवळपास ८ महिन्यांनंतर पुणे शहरात कोरोनामुळे एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी टिवटरद्वारे ही माहिती दिली आहे.
पुण्यात बुधवारी एकही कोरोनाबाधित मृत्यूची नोंद नाही. पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना, आता मृत्यू संख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. ६ फेब्रुवारी, २०२१ नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळालाय, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दररोज आढळणाºया कोरोनाबाधितांच्या संख्येत आता मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. शिवाय, कोरोनातून बरे होणाºयांची संख्या देखील वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू संख्या देखील घटत आहे.
दरम्यान, रविवारी मुंबईत देखील कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच दिवसभरात एकाही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नव्हता. निश्चितच ही बाब दिलासादायक आहे, कारण कोरोनाच्या दुसºया लाटेत मुंबई, पुणे या दोन्ही प्रमुख शहरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याबरोबरच, रुग्णांच्या मृत्यूंची देखील नोंद होत होती.