- दोन हजार रुग्णसंख्येचा टप्पा पार
पुणे – देशासह राज्यात कोविड-१९ पुन्हा नव्याने डोके वर काढत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. दुसरीकडे ओमिक्रॉनच्या रुग्णांची वाढ देखील प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये तर पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात तब्बल २ हजार ५३ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
पुणे शहरात मंगळवारी १७१ कोरोनाबाधित आढळून आले असून, ९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे बुधवारी एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या विविध रुग्णालयांत ८५ गंभीर रुग्णांवर, तर ५७ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत ३८ लाख ४५ हजार ४०९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातील ५ लाख ९ हजार २७६ जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यांपैकी ४ लाख ९९ हजार ९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात ९ हजार ११५ जणांचा मृत्यू झाला आहे. ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत जिल्हा प्रशासनाबरोबरच महानगरपालिका ही वेगवान लसीकरण मोहीम राबवत आहे. शहरात सद्यस्थितीला १८५ लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. याबरोबरच शहरातील आरोग्य यंत्रणाही सर्तक असून, वाढता धोका लक्षात घेत रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच शहरातील चारशे बेडचे जम्बो कोविड रुग्णालयही सुज्ज करून ठेवण्यात आले आहे.