पुणे जिल्हा बँकेवर अजित पवारांचे वर्चस्व

 राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनलची बाजी

– भाजपचा प्रथमच शिरकाव
पुणे – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीमध्ये २१ पैकी १९ जागा राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनलने जिंकून बाजी मारली. हा एकप्रकारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विजय मानला जातो, तर भाजपचा जिल्हा बँकेत प्रथमच शिरकाव झाला असून, दोन जागांवर त्यांनी विजय मिळवला आहे. बँका, पतसंस्था या ‘क’ वर्ग गटामध्ये अटीतटीची लढत होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश घुले यांच्यावर भाजपचे प्रदीप कंद यांनी १४ मतांनी मात केली, तर याआधी इंदापूर ‘अ’ वर्ग सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली असून, अशाप्रकारे भाजपचे दोन सदस्य संचालक मंडळात कार्यरत झालेत.

जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये २१ पैकी १४ संचालक बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित सात जागांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी झाली. विद्यमान संचालक आत्माराम कलाटे- मुळशी, प्रकाश म्हस्के- हवेली, तज्ज्ञ संचालक सुरेश घुले- हवेली यांना पराभव पत्करावा लागला. मुळशी तालुक्यात व विद्यमान संचालक आत्माराम कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील चांदेरे यांच्यात लढत झाली. यात चांदेरे २७ मते घेऊन विजयी झाले, तर कलाटे यांना १८ मते मिळाली. हवेली तालुक्यातील जोरदार रस्सीखेच झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने येथे मैत्रीपूर्ण लढत घोषित केली होती, यामध्ये विकासनाना दांगट ७३ मते घेऊन विजय झाले, तर प्रकाश म्हस्के यांना ५८ मते मिळाली. शिरूर तालुक्यामध्ये आमदार अशोक पवार यांचा एकतर्फी विजय झाला. पवार यांना १०९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी आबासाहेब चव्हाण यांना २१ मते मिळाली. बँका, पतसंस्थांसाठी असलेल्या ‘क’ वर्ग गटामध्ये भाजपचे प्रदीप विद्याधर कंद यांनी जोरदार मुसंडी मारून विजय मिळवला. कंद यांना ४०५ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश घुले यांना ३९१ मते मिळाली. इतर संस्थांच्या ‘ड’ वर्ग गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी मोठा विजय मिळवला. दुर्गाडे यांना ९४८ तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे दादासाहेब फराटे यांना २६५ मते मिळाली.
महिला प्रवर्गातील दोन जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा बुट्टे-पाटील आणि निर्मला जागडे विजयी झाल्या, बुट्टे-पाटील यांना २७४९ तर जागडे यांना २४८८ मते मिळाली. भाजपच्या आशा बुचके पराभूत झाल्या. त्यांना ९३३ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तावरे यांनी विजयी उमेदवारांची घोषणा करून त्यांना प्रमाणपत्र वाटप केले.

जिल्हा बँकेतील संचालकांचे पक्षीय बलाबल याप्रमाणे-

  • राष्ट्रवादी काँग्रेस –

 

अजित पवार (बारामती)

दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव)
रमेश थोरात (दौंड)

अशोक पवार (शिरूर)
दिलीप मोहिते (खेड)

संजय काळे (जुन्नर)
माऊली दाभाडे (मावळ)

सुनील चांदेरे (मुळशी)
रेवणनाथ दारवटकर (वेल्हे)

दत्तात्रेय भरणे (पणन प्रक्रिया संस्था ब गट)
प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे (ड गट)

संभाजी होळकर (ओबीसी)
दत्तात्रेय येळे (भटक्या विमुक्त जाती)

प्रवीण शिंदे (अनुसूचित जाती)
पूजा बुट्टे-पाटील (महिला)

निर्मला जागडे (महिला)

  • काँग्रेस –

संग्राम थोपटे (भोर)
संजय जगताप (पुरंदर)

  • भाजप –

अप्पासाहेब जगदाळे (इंदापूर)
प्रदीप कंद (बँका पतसंस्था)

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …