- दहावा हप्ता १ जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात
- १० कोटी शेतकऱ्यांना फायदा
नवी दिल्ली – नवीन वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या वतीने देशातील शेतकऱ्यांना गिफ्ट मिळाणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता १ जानेवारीला देण्यात येणार आहे, म्हणजेच १ जानेवारीला देशातील एकूण १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर २० हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत १.६ लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने एक निवेदन जारी केले असून, त्यामध्ये सांगण्यात आले की, १ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता हस्तांतरित करण्याची घोषणा करतील. दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजना ही केंद्राची योजना असून, याचा सर्व खर्च केंद्र सरकारकडून केला जातो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने डिसेंबर २०१८ साली केली होती. या अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात. हे पैसे प्रत्येकी २००० रुपये अशा तीन हप्त्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात.