मुंबई – यंदा अवेळी पडणाऱ्या पावसामुळे अनेक पिकांवर त्याचा फटका बसला. हापूस आंबादेखील त्यातून काही सुटला नाही. कोकणात कोसळत असलेल्या धो-धो पावसामुळे हापूस मोहोर प्रक्रियेवर त्याचा फटका बसत असून, यंदा हापूस बाजारात कमी प्रमाणात येण्याची शक्यता आहे. तसे पाहता, नोव्हेंबर महिन्यात पडणारी कडाक्याची थंडी हापूससाठी पोषक मानली जाते, पण आता पाऊस कोसळत असल्याने सारी गणिते बदलली आहेत. याचा फटका थेट आंबा बागायतदारांना बसला असून, हापूस मोहोर प्रक्रियेदरम्यान पाऊस झाल्याने हापूसचे आगमनदेखील लांबण्याची दाट शक्यता आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीने सर्व परिस्थिती जाणून घेण्यासाठी थेट आंबा बागायतदारांना गाठले. त्यावेळी एक आंबा बागायतदार म्हणाले की, पावसाने आंबा बागायतदारांची सारी गणिते बिघडवली. काही जणांनी पहिली आणि दुसरी फवारणी झाडांवर केली असून, त्यात काही लाखांचा देखील खर्च केला आहे. माझ्या एक हजार झाडांना फवारणी करण्यासाठी मला ८ ते १० लाखांचा खर्च येतो. त्यावरून एक किमान तुम्हाला अंदाज येईल, पण पावसाने केलेल्या साऱ्या फवारण्या मातीमोल केल्या. आता किमान कुठे तरी दिसणारा मोहोर जाणार. झाडांना रोगांचा सामना करावा लागणार. त्यामुळे फवारणीसाठीचा हा खर्च आणखीदेखील वाढू शकतो. शिवाय, थंडीदेखील न पडल्यास हापूसची मोहोर प्रक्रिया लांबल्यास त्याचा परिणाम हा हापूस बाजारात दाखल होण्यावर होणार आहे. तसे पाहता, रत्नागिरी जिल्ह्यात किमान ६६ हजार हेक्टरवर हापूसची लागवड आहे, पण निसर्गाच्या लहरीपणामुळे या संपूर्ण लागवडीवर मात्र नक्कीच परिणाम होतो. वाढता खर्च, त्यानंतर मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळदेखील बसत नाही असे आंबा बागायतदार सांगतात.