
बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या १८२ धावांचा पल्ला गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पापुआ न्यु गिनीच्या संघाने बांगलादेशच्या आक्रमक गोलंदाजीपुढे अक्षरश: नांगी टाकली. त्यांचा यष्टीरक्षक किपलीन डोरिगा (नाबाद ४६) वगळता कोणत्याच फलंदाजाला बांगलादेशच्या गोलंदाजी समोर तग धरता आली नाही. थोड्या थोड्या धावांच्या फरकाने एकामागे एक त्यांचे फलंदाज तंबूत परतले. आणि १९.३ षटाकांत ९७ धावांवर त्यांचा डाव आटोपला. पापुआ न्यु गिनीचे लेगा सीयाका (५), असद वाला (६), चार्लस अमिनी (१) आणि सायमन (०). सेसे बाऊ (७), हीरी हीरी (८), नॉरमन वनुआ(०), चॅड सोपर (११), कबूआ मोरीया(३), डॅमेन लावू ५ धावा करून एका मागे एक बाद झाले. आणि पीएनजीचा डाव १९.३ षटकांत ९७ धावांवर आटोपला. या सामन्यात गिनीच्या किपलीनने ३४ चेंडूंत २ चौकार व २ षटकार झळकावत नाबाद ४६ धावांची खेळी केली. मात्र सहकाऱ्यांची साथ न मिळाल्याने तो या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. व त्याच्या संघाला ८४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
तत्पूर्वी बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पापुआ न्यु गिनी (पीएनजी) च्या काबुआ मोरियाने सलामीजोडीतील मोहम्मद नईम पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर खातेही न उघडू देता झेलबाद करत बांगलादेशला पहिला हादरा दिला. त्यानंतर लिडन दास (२९), मुशफिकुर रहीम (५), शाकिब अल हसन(४६), महमुदुल्लाह (५०), नुरुल हसन (०) आणि आफिफ होसेन २१ धावा करून बाद झाले. तर मोहम्मद सैफुद्दिन आणि महेदी हसन क्रमश: २१ व २ धावांवर नाबाद राहिले. या सामन्यात बांगलादेशच्या महमुदुल्लाहची खेळी लक्ष्यवेधी ठरली त्याने २८ चेंडूंत ३ चौकार आणि ३ षटकार झळकावत अर्धशतकी खेळी केली, तर शाकिबने ३७ चेंडूंत शानदार ३ षटकार झळकावले. बांगलादेशच्या या खेळीच्या जोरावर त्यांनी २० षटकांत ७ फलंदाजांच्या बदल्यात १८१ धावा करत पापुआ न्यु गिनीला विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यात पीएनजीच्या कबुआ मोरिया, डॅमेन रावू आणि असद वाला यांनी प्रत्येकी २ तर सायमन अटाईने एक गडी बाद केला.