चिरंजीवी प्रदीर्घ काळापासून दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीचा हिस्सा आहे. आपल्या प्रदीर्घ करिअरमध्ये त्याने आजवर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. सुपरस्टार चिरंजीवीने त्यानंतर बराच काळ चित्रपटातून ब्रेकही घेतला होता, परंतु आता तो पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी दाखल झाला आहे. चिरंजीवीप्रमाणेच त्याचा मुलगा रामचरणनेही दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमावले आहे व आपल्या पित्याप्रमाणेच त्याने यश मिळवले आहे. आता या बाप-बेट्यांच्या चाहत्यांना एक खूप मोठी ट्रीट मिळणार आहे. आता हे दोघेही पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकत्र काम करताना दिसून येणार आहे.
खरेतर चाहते या दोघांना एकत्र पाहण्यासाठी बऱ्याच काळापासून प्रतिक्षा करत होते. आता या दोघांनीही त्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे. हे दोघे आचार्य या चित्रपटात एकत्र काम करताना दिसून येणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. आचार्य पुढील वर्षी म्हणजे २०२२मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ४ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. रामचरण आणि चिरंजीवी यांच्या जोडीला या चित्रपटात पूजा हेगडे आणि काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. या चित्रपटाची पहिली झलक रामचरणने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. टीझर शेअर करताना रामचरणने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘सिद्धा सागा टिझर आऊट’. ११ मिनिट ११ सेकंदाच्या या टीझरमध्ये रामचरण हा लहान मुलांबरोबर मस्ती करण्याबरोबरच, गरीबांना जेवण देताना तसेच पूजा हेगडेबरोबर रोमान्स करतानाची झलक पाहायला मिळते, परंतु अखेरीस जंगलात लढाई करतानाचा रामचरणचा इंटेन्स लूक पाहायला मिळतो. टीझरच्या एका सीनमध्ये तो आपला पिता चिरंजीवी याच्यासोबत स्क्रिन शेअर करतानाही दिसून येतोय.