पश्चिम बंगालमधील भीषण अपघातात १८ जणांचा मृत्यू

नदिया – मृतदेह घेऊन स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नातेवाईकांवर काळाने घाला घातल्याची भीषण दुर्घटना शनिवारी रात्री उशिरा जिल्ह्यात घडली. या भीषण अपघातात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा अपघात घडल्यानंतर घटनास्थळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नातेवाईकांवरच काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर २४ परगणामधील बगदा येथील जवळपास ३० जण एका खासगी वाहनाने नवद्विप स्मशानभूमीकडे जात होते. हंसखाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलबारी येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका ट्रकला या वाहनाने जोरदार धडक दिली. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावरील दाट धुके आणि वाहनाचा वेग अधिक असल्याने ही दुर्दैवी घटना घडली. दाट धुक्यामुळे चालकाला ट्रक दिसला नसावा आणि तो वेगात जाऊन ट्रकला धडकला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, तपासाला सुरुवात केली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनातील सर्व जण अंत्यसंस्कारासाठी नवद्विप स्मशानभूमीकडे जात होते. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मिळून घटनास्थळी मदतकार्य केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …