पवार साहेबांची एवढी ॲलर्जी का?; भुजबळांचा पडळकरांना टोला

नाशिक – शरद पवार साहेबांची कोणाला ॲलर्जी असण्याचे कारण नाही. त्यांच्या मताला आणि अनुभवाला किंमत आहे, असे म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी गोपीचंद पडळकरांना उत्तर दिले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परबांना शरद पवारांच्या जीवावर राहण्यापेक्षा स्वत: पुढे जाऊन संप मिटवा, असा सल्ला दिला आहे. खरेतर दोन महिन्यांपासून जास्त चाललेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सोडवण्यासाठी स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुढाकार घेतला. त्यांच्या विनंतीला मान देत अनेक संघटनांनी या संपातून माघार घेतल्याची घोषणा केली. त्यावरून पडळकर आक्रमक झाले आहेत.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून परिवहन मंत्री अनिल परब यांना लक्ष्य करताना, आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात. त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत? असा सवाल केला. आता पडळकरांना छगन भुजबळ यांनी नाशिकमधून जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, पवार साहेबांची ॲलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही. ज्यांच्या मताला आणि अनुभवला किंमत आहे, असे फक्त शरद पवार आहेत. प्रश्न सुटत नसतील, तर महाविकास आघाडीची प्रश्न सोडवण्याची सामूहिक जबाबदारी आहे. पवार साहेब राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांना लोकांच्या संबंधात काळजी वाटणे स्वाभाविक आहे. गिरणी कामगारांचा संप अजून संपला, असे कोणी जाहीर केलेला नाही. त्यामुळे मिलमधील लोक देशोधडीला लागले. एसटी संपाबाबत एवढा अट्टाहास करणे योग्य नाही. कामगारांना समजावून सांगणे हे पवार साहेबांचे काम असल्याची आठवण त्यांनी पडळकरांना करून दिली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …