पवार-संजय राऊत यांची भेट; तर दिलीप वळसे-पाटलांसोबत बैठक

राजकीय चर्चांना उधाण
मुंबई – राज्यातील घडामोडींवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच मंगळवारी सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. ही खासगी भेट असल्याचे सांगण्यात येत असले, तरी भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे, तसेच शरद पवार यांनीही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हेही उपस्थित होते. या भेटीगाठीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
संजय राऊत हे मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी गेल्याचे सांगितले जात आहे; मात्र यावेळी राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडी सरकारची मोट बांधण्यामध्ये संजय राऊत आणि शरद पवार यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यामुळेच ही भेट अनौपचारिक असली, तरी शासन आणि प्रशासनासंदर्भातील काही विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. सकाळी ९च्या सुमारास संजय राऊत हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाले. सपत्निक त्यांनी पवारांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले गेले. दिवाळीच्या शुभेच्छांची आदान-प्रदान झाल्यावर या भेटीत महत्त्वाच्या राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. जवळपास तासभर झालेल्या भेटीनंतर राऊत सिल्व्हर ओकवरून निघाले. त्यानंतर पवारही वळसे-पाटलांच्या भेटीसाठी रवाना झाले.
शरद पवार, दिलीप वळसे-पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यातील बैठकीत एनसीबी कारवाई, ड्रग्ज प्रकरणांवर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकरणांतील वस्तुस्थितीची शरद पवार यांनी माहिती घेतली असल्याचे समजते. या भेटीत मुंबईतील ड्रग्ज प्रकरण, हायव्होल्टेज आर्यन खान ड्रग्ज प्रकरण, अनिल देशमुख अटक प्रकरण या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती कळते. अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खंडणी मागितल्याचा जो आरोप होतोय, त्याप्रकरणी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांच्या एसआयटीने तपास सुरू केला आहे. त्याबाबतही पवार यांनी माहिती घेतल्याचे समजते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …