असे म्हटले जाते की, पती-पत्नीच्या नात्यात कोणतेही रहस्य नसते, तरच आयुष्य शांततेने निभावले जाते. अमेरिकेतील कनेक्टिकट येथे राहणाºया एका महिलेने आपल्या पतीशी जे केले, ते खरोखरच विचित्र आहे. महिलेने तिच्या पतीच्या खात्यातून सुमारे साडेचार कोटी रुपये उडवले आणि त्याला कळूही दिले नाही. तिची चोरी करण्याची ही पद्धत इतकी अफलातून आहे की, तुम्ही असा विश्वासघात याआधी फक्त चित्रपटांमध्येच पाहिला असेल.
पती-पत्नीचे नाते विश्वासाचे असते. अशा परिस्थितीत जर पत्नीने पतीला फसवले, तर आयुष्य खूप कठीण होऊन बसते. कनेक्टिकटमध्ये राहणाºया एका माणसाचे आयुष्य त्याच्या पत्नीने अशा प्रकारे उद्ध्वस्त केले की, पैशांसोबतच त्याचे मानसिक संतुलनदेखील जवळजवळ बिघडले आहे.
डोना मारिनो नावाच्या या महिलेने आपल्या पतीच्या खात्यातून हळूहळू ४ कोटी ४४ लाख रुपये काढले. पतीने जेव्हा जेव्हा याबद्दल विचारले, तेव्हा ती महिला त्याला इतकी गोंधळात टाकायची की, त्याला त्याच्या स्मृतीवरही विश्वास बसेना. ही कथा स्त्रीच्या विश्वासाची आणि दुष्ट मनाची आहे.
धूर्त महिलेने तिच्या पतीच्या पेन्शनचे धनादेश, नुकसानभरपाई आणि २० वर्षांच्या सामाजिक सुरक्षा उत्पन्नातून $६००,००० म्हणजे ४ कोटी ४४ लाख रुपये चोरले. पतीच्या आर्थिक बाबींची सर्व जबाबदारी पत्नीच्या हातात असल्याने ती मुकाटपणे पैसे चोरून पतीला स्मृतिभ्रंश झाल्याचे पटवून देत असे. जेव्हा-जेव्हा पतीला बँकेत जायचे होते, तेव्हा आरोपी पत्नी म्हणायची की, अल्झायमरमुळे गेल्या वेळी तिथे तू गोंधळ केला होता, त्यामुळे तू तेथे जाऊ नये, असे ती सांगायची. पतीने आपला आजार कधीच डॉक्टरांना दाखवला नाही, मात्र पत्नीने वारंवार सांगितल्याने त्यानेही त्याला अल्झायमर झाला आहे हे असे मानून घेतले.
पुरुषाच्या दुसºया पत्नीचा हा घोटाळा तेव्हा उघडकीस आला, जेव्हा त्याच्या मुलीने त्या व्यक्तीचे स्टेटमेंट चेक केले. त्या व्यक्तीला त्याच्या क्रेडिट कार्डवरून झालेल्या व्यवहारांची माहिती नव्हती. या प्रकरणाच्या तपासानंतर डोना मारिनोने पतीच्या खात्यातून पैसे काढून स्वत:च्या खात्यात जमा केल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत तिने कुटुंबाला मदत करण्यासाठी हे काम करत असल्याचे सांगितले. सध्या या महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, तिच्या पतीने तिला घटस्फोटही दिला आहे.