पडदा उघडणार, पडदा उजळणार

प्रफुल्ल फडके/द स्क्रीन
9152448055

तब्बल १९ महिन्यांच्या कालावधीनंतर आता नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे उघडणार आहेत. सर्वसामान्यांसाठी लॉकडाऊन २२ मार्च, २०२०पासून लागू झाला असला, तरी चित्रपटगृह, मॉल यांच्यासाठी तो अगोदर महिनाभर लागू झाला होता. प्रथम गर्दीची ठिकाणे कमी करण्यासाठी सर्वात प्रथम बंदीची ही संक्रांत चित्रपटगृहांवर आली होती. त्यामुळे आजपासून पडदा उजळणार आहे, याचा आनंद आहे. नाट्यगृहातून तिसरी घंटा वाजेल, तर चित्रपटगृहातील रूपेरी पडदा आज उजळून निघेल.
टीव्हीवर कितीही चित्रपट पाहिले, तरी चित्रपट पाहण्याचे खरे सुख आणि आनंद हा चित्रपटगृहातच असतो. चित्रपटाचा खरा आनंद हा पूर्वीच्या काळात असायचा. आजकाल आॅनलाईन बुकिंग असल्यामुळे चित्रपटाचा तेवढा आनंद राहिलेला नाही. पहिल्या दिवशी पहिला शो, गर्दीत रांगेत उभे राहून तिकीट काढून पाहण्याचा जो आनंद असतो तो काही औरच असतो.

एक काळ असा होता की, प्रत्येक शुक्रवारची वाट पाहिली जायची. रांगेत उभे राहून तिकीट काढायचे. मनात धाकधूक असायची की, आपण खिडकीपर्यंत पोहोचेपर्यंत हाऊस फुलचा बोर्ड लागणार नाही ना? त्यामुळे रांगेत आपल्या पुढे असणारा हा शत्रूच वाटायचा. त्यात तो चित्रपट अमिताभ बच्चनचा असेल, दादा कोंडकेंचा असेल, तर पहिल्या आठवड्यात तिकीट मिळवणे हे सोपे नसायचे. बहुतेक जुन्या चित्रपटगृहात महिलांसाठी स्वतंत्र खिडकी असायची. मग कोणी ओळखीचे महिलांमध्ये भेटते का पाहायचे आणि ओळखीचा फायदा घेत आपलेही तिकीट काढायला सांगायचे प्रकार व्हायचे.
बहुतेक तिकीट विंडोंवर हुल्लडबाज गुंडांचीच गर्दी असायची. दस का बीस असे ओरडून ब्लॅक करणारे जास्तीत जास्त तिकिटे मिळवून हाउसफुल पाटी बघून परत जाणाºयांना तिकिटे विकायचा धंदा करत. त्यामुळे अनेक ठिकाणी चित्रपटगृहाचे व्यवस्थापक एका व्यक्तीला दोनच तिकीट दिले जाईल, अशी पाटी लावत. काही काही चित्रपटगृहांनी टेलिफोन बुकींग, अ‍ॅडव्हान्स बुकींगची सोय केलेली असायची; पण त्यासाठी फोन लागणे फार महत्त्वाचे असायचे. फोन काही सगळ्यांकडे नसायचा त्यामुळे फोनवरून बुक करणारा हा प्रतिष्ठीत असायचा. ती तिकिटे बाल्कनीचीच असायची.

पंचवीस-पंचवीस आठवडे चित्रपट चालले, तरी पहिल्या आठवड्यात तो चित्रपट पाहिला म्हणजे त्याचा आनंद सचिन तेंडुलकरला शतक काढल्यानंतर होत नसेल त्यापेक्षा जास्तच असायचा. मग मित्रांना, घरच्यांना तो चित्रपट कसा भारी आहे किंवा बंडल आहे, हे सांगून त्या चित्रपटाची स्टोरी सांगायची. चित्रपटाची स्टोरी एकदा पाहून अगदी अचूकपणे व्यवस्थित सांगणारी मंडळी जेमतेम ३५ टक्क्यांनी पास झालेली असायची. ही स्मरणशक्ती त्यांनी अभ्यासात दाखवली असती, तर कदाचित शंभरापेक्षा जास्त मार्क त्यांना मिळाले असते, असे वाटते; पण टॉकीजमध्ये जाऊन चित्रपट पाहणे यासारखे सुख कोणते नाही. गेली १९ महिने हा आनंद चित्रपटरसिकांना मिळाला नव्हता. तो आजपासून मिळणार आहे.
माणूस भुकेला असल्यावर अगदी मन लावून जेवतो, तसे आज सगळे जण चित्रपट पाहताना अगदी सुरुवातीच्या जाहिराती, स्लाइड, ट्रेलरपासून बघत पूर्ण आनंद घेतील. चित्रपटाचा खरा आनंद तोच असतो. ब्लॅकआऊट झाल्यावर रांगेत चाचपडत, बाकीच्या माणसांना तुडवत, त्यांच्या डोळ्यांपुढून त्यांना चित्रपटात डिस्टर्ब करत उशिरा येणाºयांचा त्यामुळेच नेहमी राग येतो. चित्रपटाला वेळेवर यायला काय होते? मग आल्यावर कुठे तरी चाचपडत बसायचं आणि किती वेळ झाला सुरू होऊन विचारायचे आणि शेजाºयाचाही आनंद हिरावून घ्यायचा; पण आज असे काही होणार नाही ही अपेक्षा आहे. सगळे जण वेळेवर कोरोनाचे निर्बंध पाळून चित्रपट पाहतील आणि या क्षेत्रावरचे आपले प्रेम प्रकट करतील ही अपेक्षा आहे.

पूर्वीच्या काळी चित्रपटगृहांतून चित्रपट पाहायला गेल्यावर अनेक गोष्टींचा आनंद असायचा, म्हणजे तिकीट मिळाल्यावर आत कधी सोडतात याची प्रतीक्षा. आत सोडल्यावर मुख्य दरवाजातून डोअर किपर कधी आत सोडणार याची प्रतीक्षा. ते आत सोडेपर्यंत त्या पॅसेजमध्ये लावलेली पोस्टर्स पाहणे, काचफलकात त्या सिनेमाचे लावलेले फोटो पाहणे. हे स्टील फोटो पाहिल्यावर ती अ‍ॅक्शन चित्रपटात कधी बघायला मिळते याची उत्सुकता असणे, हे प्रकार अतिशय आनंद देणारे असत.
एकदा आत गेल्यावर बॅटरीने डोअरकिपरने आपल्याला सीट दाखवणे, मग तिथे बसल्यावर पडद्याकडे नजर लावून बसणे. त्यानंतर स्लाइड सुरू होणे. मग लक्स, व्हिको वज्रदंती आणि व्हिको टरमेरीकची हमखास दिसणारी जाहिरात. अशा पाच-सात जाहिराती झाल्यावर भारतीय समाचार चित्र यायचे. त्यातील एका विशिष्ठ आवाजातील ती डॉक्युमेंटरी पाहणे फार मौजेचे असायचे. टीव्ही नव्हता त्या काळात तर इंडियन न्यूज किंवा भारतीय समाचार चित्र हे प्रत्येक टॉकीजमध्ये चित्रपटापूर्वी दाखवणे सक्तीचे होते. टॉकीजवाल्यांना त्याचाही चांगला इन्कम सरकारकडून असायचा. मग त्यात आठ-पंधरा दिवसांत घडलेल्या सगळ्या बातम्यांची माहिती बघायला मिळायची. कृष्णधवल अशा त्या भारतीय समाचार चित्रमध्ये पंतप्रधानांचा कुठला तरी पूरग्रस्तांचा दौरा, त्यांचे कुठले तरी भाषण, कुठल्या तरी उत्सवाला त्यांची असलेली उपस्थिती अशा बातम्या असत. याशिवाय एखादा खेळाचा सामना, त्याची काही सेकंदांतील क्षणचित्रे अशा बातमी वजा त्या इंडियन न्यूज संपताना एक घंटा वाजायची आणि ब्लॅकआऊट व्हायचा. त्याबरोबर सगळे आता चित्रपटाला सुरुवात होणार, म्हणून सावरून बसायचे. मग एकदाचे ते सर्टिफिकेट आल्यावर तो किती रिळांचा चित्रपट आहे, हे पाहिले की, जीव भांड्यात पडायचा. आजकाल मीटर रिल असे येत नाही, तर चित्रपट किती मिनिटांचा आहे, हे दाखवले जाते; पण हा खरा पडदा उजळेपर्यंतचा आनंद लक्षात राहणारा असायचा.

 

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *