नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दोन नव्या योजनांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी शुभारंभ झाला. सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून या योजनेचा पंतप्रधान मोदी यांनी शुभारंभ केला. आरबीआय रिटेल डायरेक्ट स्किम अर्थात आरबीआय किरकोळ गुंतवणूकदारांसाठी प्रत्यक्ष योजना आणि रिझर्व्ह बँक- एकात्मिक लोकपाल योजना या दोन योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधन केले. यावेळी ते म्हणाले की, आज ज्या दोन योजनांचा शुभारंभ केला, त्यामुळे देशातील गुंतवणूक वाढणार आहे, तसेच या योजनांमुळे गुंतवणूकधारकांसाठी कॅपिटल मार्केटपर्यंत पोहचणे अधिक सुरक्षित आणि सोपे होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना महामारीच्या कठीण काळात अर्थ मंत्रालय, आरबीआय आणि अन्य आर्थिक संस्थांनी प्रशंसनीय काम केले आहे. आतापर्यंत मध्यम वर्ग, कर्मचारी, लहान व्यापारी, वरिष्ठ नागरिक यांना सिक्युरिटीजमध्ये गुंतवणुकीसाठी बँक इन्श्युरन्स अथवा म्युचल फंडसारख्या गोष्टीचा वापर करावा लागत होता. आता या दोन योजनांमुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मोदी पुढे म्हणाले, मागील सात वर्षांमध्ये एनपीएएसमध्ये पारदर्शकता आल्याने त्याची दखल घेतली जात आहे. रिझोलेशन आणि रिकव्हरीवर लक्ष केंद्रित केले जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे पुनर्भांडवलीकरण करण्यात आले. वित्तीय प्रणाली आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एकापाठोपाठ एक अशा अनेक सुधारणा करण्यात आल्या. बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी, सहकारी बँकांनाही आरबीआयच्या कक्षेत आणण्यात आले. त्यामुळे या बँकांचा कारभारही सुधारत असून, लाखो ठेवीदारांचा या सिस्टमवरील विश्वासही दृढ होत आहे.