चंदीगढ – पंजाबमधील निवडणूक ऐन तोंडावर आली आहे. अशात त्यांनी पंजाबच्या जनतेसाठी एक मोठे गिफ्ट दिले आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांत अस्थाई स्वरूपात जे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना नोकरीत कायम करण्याचा निर्णय चन्नी सरकारने घेतला आहे. राज्य सरकारचा हा एक मोठा निर्णय असून, याचा फायदा पंजाबमधील जवळपास ३६,००० कर्मचाऱ्यांना होणार आहे.
मुखमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अस्थाई स्वरूपात काम करणाऱ्या नोकरदारांच्या नोकऱ्या कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पंजाब प्रोटेक्शन अँड रेगुलराइजेशन ऑफ कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉइज बिल-२०२१ पास करण्यात आला. आता हे विधेयक मान्यतेसाठी विधानसेभेत सादर केले जाणार आहे. या निर्णयाबाबत बोलताना मुख्यमंत्री चन्नी म्हणाले की, ही एक चांगली योजना आहे. या योजनेंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या विविध भागांत दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा दिली. त्यांना कायमस्वरूपी नोकरीवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सुमारे ३६,००० कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या विधेयकाला मंजुरी देण्यासोबतच पंजाब सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आली आहे. किमान वेतनामध्ये ४१५.८९ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पंजाबमध्ये किमान वेतन हे ८७७६.८३ रुपये इतके आहे. आता त्यामध्ये वाढ करून ते ९१९२.७२ रुपये करण्यात आले आहे.