पंजाब : पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी; फिरोजपूर सभा रद्द

गृहमंत्रालयाने मागवला अहवाल
चंदिगड – पंजाबमधील फिरोजपूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारची सभा रद्द करण्यात आली. पंतप्रधान मोदी दिल्लीला परतले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. कृ षी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता. ते पंजाबमधील जनतेला संबोधित करणार होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हेदेखील या रॅलीत सहभागी होणार होते. गृह मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवारी सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे दाखल झाले, तेथून ते हुसैनवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु, पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे मोदींना सुमारे २० मिनिटे प्रतीक्षा करावी लागली होती.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब भागात रॅली घेणार होते, मात्र त्यांच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्यामुळे ही रॅली रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फिरोजपूर येथे मोदींच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, मात्र सुरक्षेत चूक घडल्यामुळे ते फिरोजपूरमधील रॅलीला जाऊ शकले नाहीत. काही आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला अडवले. त्यामुळे १५ ते २० मिनिटांपर्यंत हा ताफा फ्लायओव्हरवर अडकला होता. पंजाब सरकारला आधीच मोदींच्या कार्यक्रमाची माहिती होती. त्यामुळे त्यांनी प्लान बी तयार ठेवणे अपेक्षित होते, असे सांगितले जात आहे. याशिवाय रस्ते मार्गावर पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली नव्हती. ही गंभीर चूक असल्याचे मानले जात आहे.
आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा…
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी पंजाब दौऱ्यावर होते. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन होणार होते. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी त्रुटी आढळली. पंतप्रधान यांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार होता, त्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक असल्याचे दिसून आले. त्यामुळे पंतप्रधान मोदी सुमारे २० मिनिटे आपल्या गाडीतच बसून होते. त्यानंतर मोदी यांनी आपला पंजाब दौरा रद्द केल्याचे सांगण्यात आले. या सर्व घडामोडीनंतर पंतप्रधानांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मोदींनी आपला पंजाब दौरा रद्द करून ते पुन्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमातळावर जिवंत पोहोचू शकलो’, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी संताप व्यक्त केल्याचे समजते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …