ठळक बातम्या

 न्यूझीलंडची पुढील वर्षीच्या वर्ल्ड कप स्पर्धेमधून माघार

मुंबई – टी-२० वर्ल्ड कपची सांगता होताच आयसीसीने आगामी काळात होणाऱ्या स्पर्धांची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून २०२४ ते २०३१ या काळातील ८ स्पर्धांचे यजमान देश जाहीर करण्यात आले आहेत. यापैकी तीन स्पर्धा भारतामध्ये होणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेवर लक्ष ठेवून २०२४ साली होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे संयुक्त यजमानपद अमेरिकेला देण्यात आले आहे. आयसीसीने बुधवारी पुढील वर्षी वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या अंडर-१९ वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. हे वेळापत्रक जाहीर होताच स्पर्धेला धक्का बसला आहे. न्यूझीलंडने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. न्यूझीलंडने हा निर्णय देशातील अल्पवयीन नागरिकांना स्पर्धेतून परत आल्यानंतर पाळव्या लागणाऱ्या अनिवार्य क्वारंटाईन नियमांमुळे घेतला आहे.
न्यूझीलंडच्या जागी स्कॉटलंडचा १६ वी टीम म्हणून स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. आयर्लंडला यापूर्वी या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरवण्यात अपयश आले होते. १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारीदरम्यान वेस्ट इंडिजमधील १० वेगवेगळ्या ठिकाणी ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यजमान वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया स्पर्धेने या वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. स्पर्धेत एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत. अँटिगा आणि बार्बुडा, गयाना, सेंट किट्स आणि नेव्हिस, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील १० मैदानांवर १६ संघांमध्ये सामने खेळवले जातील.
अंडर-१९ वर्ल्ड कप १९८८ पासून खेळवला जात आहे. आतापर्यंत या स्पर्धेचे १३ सिझन झाले आहेत. त्यामध्ये भारताने सर्वाधिक चार वेळा ट्रॉफी जिंकली आहे. भारताने २००० साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वात, २००८ साली विराट कोहली, २०१२ साली उन्मुक्त चंद आणि २०१८ साली पृथ्वी शॉच्या नेतृत्वात अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकला होता. अंडर-१९ वर्ल्ड कपमधून अनेक स्टार खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आले आहेत. यामध्ये विराट कोहली, बाबर आझम, जो रूट, केन विलियमसन, शिमरन हेटमायर यांचा समावेश आहे.
चारवेळा चॅम्पियन ठरलेल्या भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी ‘ब’ गटात दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि नवोदित युगांडासोबत सामील करण्यात आले आहे. गतविजेत्या बांगलादेश, इंग्लंड, कॅनडा आणि संयुक्त अरब अमिराती या ४ संघांना ‘अ’ गटात ठेवण्यात आले आहे, तर ‘क’ गटात पाकिस्तान, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. यजमान वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांना ‘ड’ गटात स्थान मिळाले आहे. स्कॉटलंड हा या गटातील शेवटचा संघ आहे, त्यांनी न्यूझीलंडची जागा घेतली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …