वेलिंग्टन – न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून ही माहिती दिली आहे. घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्सविरुद्धच्या सहा एकदिवसीय सामन्यांनंतर खेळातून निवृत्ती घेणार असल्याचे टेलरने म्हटले आहे.
टेलरने ट्विट केले आहे की, मी बांगलादेशविरुद्ध मायदेशात २ कसोटी सामने, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स विरुद्ध ६ एकदिवसीय सामन्यांनंतर माझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. ‘हा एक अद्भूत प्रवास होता. जोपर्यंत मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकेन, तोपर्यंत मी स्वत:ला भाग्यवान समजतो. गेल्या १७ वर्षांत मी खेळातील महान व्यक्तींसोबत आणि त्यांच्याविरुद्ध खेळलो. या काळात अनेक आठवणी मिळाल्या, खूप चांगले मित्र मिळाले, हा प्रवास अद्भूत होता, परंतु सर्व चांगल्या गोष्टींचा अंत होतो आणि मला वाटते की ही वेळ योग्य आहे. मी माझे कुटुंब, मित्र आणि सर्व लोकांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी मला मी जिथे आहे तिथे पोहोचण्यास मदत केली. तुम्हा सर्वांचे आभार मानणे आणि कारणे सांगण्यासाठी भरपूर वेळ आहे, पण सध्या मला न्यूझीलंडसाठी तयारी आणि चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे.
न्यूझीलंड १ जानेवारीपासून घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. दुसरा कसोटी सामना ९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. टेलरची ही शेवटची कसोटी असेल. जानेवारीच्या अखेरीस, ते तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करतील आणि त्यानंतर मायदेशात नेदरलँड्सविरुद्ध खेळतील.
रॉस टेलरने मार्च २००६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एका वर्षानंतर, तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. टेलरने न्यूझीलंडसाठी ११० कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये ७५८४ धावा केल्या आहेत. कसोटीत त्याची सर्वोच्च धावसंख्या २९० आहे. पर्थमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही खेळी केली होती. त्याने कसोटीत तीन द्विशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर त्याने २३३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०,२८८ धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत १० शतके आणि ३५ अर्धशतके झळकावली आहेत, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने २१ शतके आणि ५१ अर्धशतके लगावली आहेत. तर त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १८१ आहे.