न्यायालयाचा कंगनाला दिलासा

जावेद अख्तरांची मागणी फेटाळली!
मुंबई – बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ कंगना राणावतने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात राहू-केतू मंदिरात पूजा करून केली. या मंदिरातील पूजेनंतर कंगनाने असेही सांगितले होते की, तिला यावर्षी कमी पोलीस तक्रारी/एफआयआर आणि अधिक प्रेमपत्रे हवी आहेत. अशा स्थितीत तिची पूजा आता फळत असल्याचे दिसत आहे. कंगना राणावतविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची जावेद अख्तर यांची मागणी मुंबईतील स्थानिक न्यायालयाने फेटाळली आहे.
लेखक-निर्माते जावेद अख्तर यांनी कंगनाविरुद्ध मानहानीच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची पुढील सुनावणी १ फेब्रुवारी रोजी अंधेरी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात होणार आहे. जावेद अख्तर यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ही याचिका दाखल केली होती.
यासंदर्भात जावेद अख्तर म्हणाले होते की, कंगना कोणत्या ना कोणत्या बहाण्याने न्यायालयात हजर होत नाही, मात्र या काळात ती सतत सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत असते. जावेद यांच्या या अर्जावर न्यायालयाने कंगनाच्या वकिलाला पुढील सुनावणीच्या तारखेला म्हणजेच ४ जानेवारी रोजी उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. याप्रकरणी कंगना अखेरची २० सप्टेंबर रोजी अंधेरी महानगर न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांच्यासमोर हजर झाली होती.
यापूर्वी याच प्रकरणात मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी तिचा मानहानीचा खटला हस्तांतरित करण्याची कंगनाची याचिका फेटाळून लावली होती. तसेच, जावेद यांच्या तक्रारीनंतर महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी अभिनेत्रीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. यानंतर कंगनाने न्यायालयात धाव घेतली. जामीन आणि जामीन रक्कम भरल्यानंतर तिच्याविरोधातील वॉरंट रद्द करण्यात आले. जावेद अख्तर यांनी २ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांचे वकील निरंजन मुंदरगी यांच्यामार्फत खासगी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी कंगनावर आयपीसीच्या कलम ४९९ (मानहानी) आणि कलम ५०० (बदनामीची शिक्षा)अंतर्गत आरोप लावले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …