
नवी मुंबई – नेरुळ परिसरात एका तरुणाने आपल्या बायकोची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन्ही मुले नातेवाईकांकडे गेल्याची संधी साधून तरुणाने बायकोचा गळा दाबून निर्घृण हत्या केली आहे. एवढेच नव्हे, तर आरोपीने बायकोच्या माहेरी जाऊन विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्नदेखील केला आहे. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात आरोपी नवºयाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
कविता वाघ असे हत्या झालेल्या ३० वर्षीय विवाहित महिलेचे नाव आहे, तर रमेश वाघ असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. आरोपी पती रमेश वाघ हा नवी मुंबईतील नेरुळ परिसरातील रहिवासी असून, त्याला दारूचे व्यसन आहे. त्याला दोन मुलेदेखील आहेत, पण दारूच्या आहारी गेल्याने त्याचा पत्नी कविता वाघ यांच्यासोबत सतत वाद व्हायचा.
अगदी क्षुल्लक कारणावरूनही दोघांमध्ये भांडण व्हायचे. दरम्यान घटनेच्या दिवशी गुरुवारीदेखील दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. यावेळी संबंधित दाम्पत्याची दोन्ही मुलेदेखील घरी नव्हती. दोघेही एका नातेवाईकाच्या घरी गेले होती. याची संधी साधून आरोपी रमेश याने आपल्या बायकोची गळा दाबून निर्घृण हत्या केली आहे. यानंतर त्याने स्वत: पत्नीच्या माहेरी फोन करून हत्येची माहिती दिली आहे. त्यानंतर आरोपीने मृत महिलेच्या माहेरी नाशिकला जाऊन विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्नदेखील केला आहे.
पण माहेरच्या लोकांनी तातडीने आरोपी रमेश याला रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी आरोपीवर उपचार केले जात आहेत, तर दुसरीकडे कविता यांना पतीने मारल्याची माहिती मिळताच त्यांच्या बहिणीने नेरुळला जाऊन त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. कविता यांचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर, कविता यांच्या बहिणीने नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास नेरुळ पोलीस करत आहेत.