लग्नाची सुरू होती तयारी; अभिनेता
सोनू सूदने गिफ्ट दिली होती रायफल
नवी दिल्ली/हावडा – राष्ट्रीय स्तरावरील युवा नेमबाज कोनिका लायक (२६) हिचा गूढ मृत्यू झाला आहे. तिने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. कोनिका बाली येथील आपल्या हॉस्टेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. हावडा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्याजवळ एक सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये ‘वैफल्यग्रस्तता’ हे आपल्या या आत्मघातकी पावलामागील कारण असल्याचे तिने नमूद केले आहे. ही घटना बुधवारी घडली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वीच कोनिकाची आई कोलकाता येथे आपल्या मुलीला भेटून गेली होती. कोनिकाच्या मृत्यूची माहिती मिळताच तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भारतीय राष्ट्रीय रायफल संघटने (एनआरएआय)लाही या घटनेने धक्का बसला आहे.
संधी मिळत नसल्याने आपण वैफल्यग्रस्त झालो होतो, असे कोनिकाने या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. कोनिकाचे येत्या फेब्रुवारीमध्ये लग्न होणार होते, अशी माहितीही या पोलीस अधिकाऱ्याने दिली. मूळची झारखंडमधील धनबाद येथील असलेल्या नेमबाज कोनिकाने राज्यस्तवरील काही पदकेही जिंकली होती. झारखंड राज्य रायफल विजेतेपद स्पर्धेत कोनिकाने एक सुवर्ण आणि रौप्य पदकही जिंकले होते. कोनिका ऑलिम्पिकपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेते जॉयदीप कर्माकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता येथे प्रशिक्षण घेत होती. कर्माकर यांच्या अकादमीमध्ये ती नाममात्र शुल्कामध्ये प्रशिक्षण घेत होती. कोनिकाच्या मृत्यूबद्दलची माहिती मिळताच वडील पार्थो लायक यांच्यासह कुटुंबीय कोलकातामध्ये दाखल झाले असल्याचे समजते.
पोलिसांनी कोनिकाच्या मृत्यूमागील कारणांचा अधिक तपास सुरू केला आहे. यापूर्वी ऑक्टोबरपर्यंत कोनिकाचे प्रशिक्षण गुजरातमध्ये सुरू होते. अहमदाबादमध्ये कोनिकासोबत शूटिंगवेळी छेडछाडीचा प्रकार समोर आला होता. कोनिका मागील एक वर्षापासून कोलकात्यातील उत्तर पाडा येथील कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेत होती. यादरम्यान ती गुजरातमध्येही प्रशिक्षणासाठी गेली होती. यावेळी तिच्यासोबत छेडछाडीचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात कोनिकावर कुठला दबाव होता का? याचा तपास आता पोलीस करीत आहेत. प्रशिक्षक आणि कोनिकाचे संबंध चांगले नव्हते, अशी माहितीही पोलिसांना मिळत आहे. त्या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत.
कोनिका ही रायफल नसल्यामुळे मित्रांकडून उधार मागून स्पर्धेत उतरली होती. कोनिका आर्थिक विवंचनेत असल्याचे समजल्यानंतर यंदा अलीकडेच अभिनेता सोनू सूदने तिला जर्मन बनावटीची एक रायफल (किंमत अडीच लाख रुपये) भेट स्वरूपात दिली होती. कोनिकाला राष्ट्रीय आणि अन्य स्पर्धांमध्ये सहभागी होता यावे या उदात्त हेतूने सोनूने तिला ही रायफल भेट दिली होती. ही रायफल मिळाल्यानंतर कोनिकाला गगनात मावेनासा आनंद झाला होता. एका ट्विटद्वारे आपला आनंद व्यक्त करतानाच तिने सोनू सूदचे आभार मानले होते.
मागील काही महिन्यांमध्ये नेमबाजांनी केलेल्या आत्महत्येची ही चौथी घटना आहे. अलीकडेच तरुण नेमबाज खूशप्रीत कौर संधू हिने आत्महत्या केली होती. खूशप्रीतने लिमा येथील जागतिक विजेतेपद स्पर्धेद्वारे आपल्या ज्युनिअर भारतीय नेमबाज म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून तिने जीवन संपवले होते. त्याआधी राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज हुनरदीपसिंग सोहल आणि नमनवीरसिंग ब्रार यांनीही आत्महत्या केली होती. हुनरदीप सिंग यानेही १० ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात आपल्या रायफलने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. नेमबाजांची आत्महत्या ही चिंतेची बाब ठरली आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …