नेता नाही अभिनेता


अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या पोस्टमध्ये अमोल कोल्हे यांनी आपण एकांतवासात जात असल्याची घोषणा केली आहे. एकांतवासात गेल्यानंतर आपण घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचारही करणार असल्याचे कोल्हे यांनी म्हटले. त्यामुळेच चर्चेला उधाण आल्याचे दिसून येते. अर्थात अमोल कोल्हे यांनी शिवसेना सोडण्यापूर्वी असा विचार केला असता, तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती. तसेही राष्ट्रवादीत जाऊन त्यांना फारसे स्थान आहे असे नाही. राष्ट्रवादीचे एक अंकाने संख्याबळ वाढवणारे खासदार एवढीच त्यांची तिथे किंमत आहे. बाकी त्यांना फिरवले जाते ते नेता म्हणून नाही, तर अभिनेता म्हणूनच फिरवले जाते. राष्ट्रवादीच्या सभांना गर्दी होत नाही, म्हणून छत्रपतींच्या भूमिका करणारा अभिनेता बरोबर असावा इतके गणित सांभाळून त्यांना राष्ट्रवादीने आपलेसे केलेले आहे. त्यामुळे त्यांना एकांतवास हा घ्यावाच लागणार होता हे नक्की. ज्या तुलनेत शिवसेनेतील अभिनेते मोकळेपणाने बोलतात ती मोकळीक राष्ट्रवादीत त्यांना मिळत नाही हे नक्की. शिवसेनेच्या इतिहासापासून अगदी दादा कोंडके असोत नाहीतर आजचे महत्त्वाचे नेते, अभिनेते आदेश बांदेकर असोत. ते ज्या मोकळेपणाने शिवसैनिक म्हणून वावरतात ती मोकळीक शिवसेना सोडल्यानंतर अमोल कोल्हे यांना लाभली नाही हे नक्की. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे एकमेव अद्वितिय असे आहेत. त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. बाकी सगळे त्यांचे मावळे असतात. शिवसैनिक असतात. पण या शिवसेनेत वाढलेल्या सैनिकाला छत्रपतींच्या मुखवट्याचा मोह पडला आणि शिवसेनेतून उडी मारून राष्ट्रवादीत गेले, पण तरीही ते तिथे जाऊन मुखवटाच घालून फिरत राहिले. सेना आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाल्यावर ज्याला विरोध केल्याचे बोलले, त्यांच्याबरोबरच राज्यात राहायचे म्हणजे युद्धात आणि तहात पराभूत झालेल्या मांडलिक राजासारखी अवस्था आज त्यांची झाली. त्यामुळे त्यांना एकांतवासाची गरज आहे हे नक्की. तसेही त्यांना अलीकडे बाजूला सारलेलेच दिसत होते. पक्षाकडून दुर्लक्षित करणे, वाळीत टाकणे याला एकांतवासात गेल्याची उपमा देण्याचाच हा प्रकार आहे.

म्हणूनच खासदार अमोल कोल्हे यांनी ही फेसबुक पोस्ट रविवारी (७ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजून १६ मिनिटांनी लिहिली. यामध्ये ते म्हणतात, सिंहावलोकनाची वेळ आहे. गेल्या काही दिवसांत बेभान होऊन वागलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावले उचलली, पण हे सगळे जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणिते, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय. थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल, पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवे थोडे मनन, थोडे चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचारसुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही. पुन्हा लवकरच भेटू…नव्या जोमाने, नव्या जोशाने. शिवाय, फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतन शिबिरासाठी नाही, असे म्हणत अखेरिस एक टीपही दिली आहे. हा टोमणा अर्थातच राष्ट्रवादीला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुका झाल्यानंतर चिंतन शिबीर घेते. मोदी सत्तेत आल्यानंतर अलिबागला चिंतन शिबीर घेतले होते. त्यामुळे आपण चिंतन शिबिरात जात नाही, असे सांगून राष्ट्रवादीपासून दूर असल्याचेच दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, तसेच फेरविचार म्हणजे त्यांना पुन्हा शिवसेनेची ओढ लागली आहे का?, अशीही शंका मनात येते. त्यामुळेच चिंतन करावे लागणार असे दिसते. कारण आज शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले असले, तरी सेना आणि राष्ट्रवादी सध्या एकत्र आहेत. त्यामुळे कोणाला दुखावायचे आणि कोणाला सुखावायचे हा पण प्रश्न आहे. त्यापेक्षा मनाची कोंडी होत असताना हा एकांतवास महत्त्वाचा आहे.
खासदार अमोल कोल्हे हे खरंतर मूळचे अभिनेते. त्यांनी टीव्ही मालिकेमध्ये केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. पुढे अमोल कोल्हे यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला काही काळ ते शिवसेनेत होते, पण लोकसभा २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हे यांच्या मतदारसंघातील लढतीने राज्याचे लक्ष वेधून घेतले. अखेर अतिशय रंगतदार झालेल्या या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी तत्कालीन शिवसेना खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांना पराभूत केले, पण त्या मतदारसंघातील अढळरावांचे असलेले अढळ स्थान त्यांना आजही मिळवता आलेले नाही. निवडून येणे आणि जनतेच्या मनातील होणे यात फरक आहे. हीच खंत त्यांना आजही वाटत असावी.
त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची कमान त्यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी अमोल मिटकरी यांच्यासमवेत शिवस्वराज्य यात्रेतून पक्षाचा जोरदार प्रचार केला. त्यांच्या प्रचारसभांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो, असा दावा पक्षाने केला होता, पण तो अभिनेता बघायला लोक येत होते. छत्रपतींच्या प्रेमापोटी लोक येत होते. हा सलाम, आदर छत्रपतींना होता अमोल कोल्हेंना नव्हता. याची जाणिव त्यांना आता झालेली असावी. लोकसभेतही अमोल कोल्हे पक्षाची बाजू ठामपणे मांडताना दिसतात. विशेषत: भाजपवर ते आक्रमक भाषेत टीका करत असल्याचे अनेक प्रसंगी दिसून आले आहे, पण त्यांच्यातील नाटकी, कृत्रिम भाषा, ऐतिहासिक भाषा प्रत्येक भाषणात दिसून येते. या मुखवट्याची भाषा आणि मूळ भाषा यातील फरक सर्वांना कळतो. त्यामुळे त्यांनी कितीही पोटतिडकीने मुद्दे मांडले, तरी ते खरे वाटत नाहीत हीच खंत आहे. त्यामुळेच त्यांना एकांतवासात जावे लागले असावे.

ही पोस्ट करून त्यांनी एखादा अनपेक्षित निर्णय घेणार असल्याचे संकेत तर दिले नाहीत ना, अशी चर्चाही सुरू आहे. कोल्हे यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने त्यांच्या पोस्टवर कमेंट्स केल्याचे दिसून येत आहे, पण या पोस्टने ते राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत असेच वाटते आहे. त्यांना अभिनेता म्हणून जनतेने स्वीकारले, पण नेता म्हणून स्वीकारलेले नाही. म्हणून अभि नेता म्हणून स्वीकारण्यासाठी हा एकांतवास असावा.

About Editor

अवश्य वाचा

आसामी दणका

 गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा आसाम पोलिसांनी गुजरातमधील पालनपूर येथील सर्किट हाऊसमधून …