निवृत्तीनंतर ८ वर्षांनीही सचिनची लोकप्रियता कायम

मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर निवृत्त होऊन आता ८ वर्षांचा कालावधी उलटला आहे. या मोठ्या कालावधीनंतरही सचिनची लोकप्रियता कायम आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या या वर्षातील ‘मोस्ट ॲडमायर्ड’ व्यक्तींच्या यादीत सचिनने टीम इंडियाच्या कसोटी मालिकेचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. ‘यूगव्ह’ या संकेतस्थळाने २०२१ मधील ‘मोस्ट ॲडमायर्ड’ व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. जगभरातील टॉप २० व्यक्तींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये क्रीडा विश्वातील चार जणांना स्थान देण्यात आले आहे. या यादीमध्ये सचिन तेंडुलकरने एकूण १२ वा तर स्पोर्ट्सच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे, तर विराट कोहलीने एकूण १८वा तर स्पोर्ट्सच्या यादीत चौथा क्रमांक पटकावला आहे.
विराट कोहली हा सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केला जाणारा भारतीय खेळाडू आहे. तरीही एकूण लोकप्रियतेच्या बाबतीत २०१३ साली निवृत्त झालेला सचिन आजही सरस असल्याचे या यादीतून स्पष्ट झाले आहे. क्रिकेटमधील सर्वाधिक शतके आणि धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. त्याचबरोबर ‘भारतरत्न’ या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित झालेला सचिन हा एकमेव क्रिकेटपटू आहे. तर दुसरीकडे विराट कोहली यंदा एकदिवसीय संघाचे कर्णधार पद सोडण्याच्या प्रकरणात वादग्रस्त ठरला होता. मँचेस्टर युनायटेड आणि पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो एकूण यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असून खेळाडूंच्या यादीत तो अव्वल आहे. रोनाल्डोने नुकताच ८०० गोल करण्याचा विक्रम केला आहे. त्याने अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे. मेस्सीने एकूण ७ वा तर खेळाडूंच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …