औरंगाबाद – राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरू आहे, असा थेट आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मंगळवारी औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक पार पडली. त्यानंतर ते औरंगाबादमधील पत्रकारांशी संवाद साधत होते. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मुद्दाम ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून घोळ घालत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, मी निवडणुकीसाठी बाहेर पडलो असे म्हणता येणार नाही. निवडणुका येतच राहतात. संभाजी नगरची निवडणूक आणखी वर्षभर पुढे आहे. निदान सहा-आठ महिने, तरी इथली निवडणूक होणार नाही. त्यासाठीच तर ओबीसीचे प्रकरण सुरू केले आहे. केंद्राने मोजायचे की राज्याने मोजायचे, यावरून मोजामोजी सुरू झाली आहे. मूळ मुद्याला कुणीही सामोरे जायला तयार नाही. त्यांची हिंमतच नाही सामोरे जाण्याची, म्हणून निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे. मंगळवारी मनसेच्या मराठवाड्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक औरंगाबादेत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काय रणनीती आखली गेली, याविषयी पत्रकारांनी विचारले असता, राज ठाकरे म्हणाले, स्ट्रॅटजी वगैरे आताच सांगत नाही. तुम्हाला सांगण्याएवढे अद्याप काही ठरलेले नाही. जेव्हा ठरेल तेव्हा सांगितले जाईल, असे राज ठाकरे म्हणाले. एका मुद्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आपल्या देशातील ५ लाख व्यावसायिकांनी देश सोडला आहे. यावर चर्चा होत नाही. त्यांच्या उद्योग, व्यवसायावर असणाऱ्यांचे पुढे काय होणार. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. शाळेची फी भरायचे पैसे लोकांकडे नाहीत. मात्र, आपण आर्यन खान प्रकरण, सुशांत सिंग प्रकरण, अंबानी प्रकरणात गुंतून पडतो. मीडियाही मूळ मुद्दे सोडून भलतेच दाखवते. यातून काहीही निष्पण्ण होत नाही, कारण मूळ प्रश्न बाजूला पडतो. अंबानी यांच्या घराखाली वाझेंनी गाडी का ठेवली? या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. मात्र, बाकी बरेच घडले.
लोक मला फुकट घालवत आहेत
लोक मला फुकट घालवत आहेत, अशी राज ठाकरे यांनी बोलून दाखवली. मूळ प्रश्नाकडे कुणाला वळायचेच नाही. निवडणुकीवेळी सर्व प्रश्नांचा विसर पडतो. जनतेचा मतपेटीतून राग व्यक्त होत नाही, असे निरीक्षणही त्यांनी यावेळी नोंदवले. ते पुढे म्हणाले की, आजही नाशिकमध्ये मनसेने चांगले काम केले असे म्हटले जाते. असा विकास झाला नाही, असा उल्लेख केला जातो. इतर ठिकाणीही रस्त्यापासून ते पाण्यापर्यंतचे प्रश्न आहेत. मात्र, निवडणुकीच्यावेळी मुख्य मुद्दे बाजूलाच राहतात. राजकारणी समाजाला बिघडवतो की, समाज राजकारण्यांना बिघडवतो. जोपर्यंत मतपेटीतून राग व्यक्त होणार नाही, तोपर्यंत कशाचाही अर्थ राहणार नाही. सध्या तरी मला लोक फुकट घालवत आहेत, अशी सल त्यांनी व्यक्त केली.
भाजपसोबतच्या युतीबाबत राज म्हणतात…
माझ्याकडे काय ऑप्शन्स आहेत, भाजप किंवा इतर कोणाशी आघाडी करायची याविषयी मला काहीही सांगायचे नाही, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरेंचा अजेंडा काय? म्हणावे एवढे काम झालेले नाही. आगामी काळात भाजपसोबत बोलणी सुरू आहे का? आदी विषयांवर त्यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. सध्या आघाडीचे दिवस आहेत. त्यामुळे आपण कोणाशी युती करणार?, काल (सोमवारी) काशीच्या निमित्ताने देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुत्वाचा सूर आळवला. त्यामुळे मतदार अशा बाबींकडे आकर्षित होतात का?, असे विचारले असता त्यांनी ठोस असं काहीही सांगितलं नाही. आता कोणतेही पत्ते उघड करणार नाही, असं त्यांनी यावेळी सांगितले.