ठळक बातम्या

निवडणुकांमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता

पश्चिम बंगाल निवडणुकीत ९००% वाढला होता कोरोनाचा फैलाव
आता ५ राज्यांमध्ये निवडणुकांमुळे काय होणार?

तिसºया लाटेवर ओमिक्रॉनचे सावट
( मुंबई चौफेर विशेष)

नवी दिल्ली – अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी २३ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाला आवाहन केले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाने निवडणुका टाळण्यावर विचार करावा. कारण जान हैं तो जहां हैं. ७ महिन्यांपूर्वी मद्रास हायकोर्टाने असेच आवाहन केले होते. त्यावेळी मद्रास कोर्टाने तर निवडणुका आयोजित करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाºयांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला तरी तो कमीच ठरेल, असे म्हटले होते. त्यामुळे निवडणुकांमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर कोरोना रुग्णांमध्ये ९०० टक्क्यांनी वाढ झालेली होती. त्यात ओमिक्रॉनच्या सावटाखाली होणाºया या निवडणुका तिसºया लाटेला आमंत्रित करतील अशी शक्यता आहे.
मद्रास हायकोर्टाने निवडणुका झाल्यानंतर हे विधान केले होते, तर अलाहाबाद हायकोर्टाने निवडणुका होण्यापूर्वीच सतर्क केले आहे, पण दोन्ही कोर्टांचे आवाहन कोरोनाच्या फैलावावर चिंता व्यक्त करणारे आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. निवडणूक आयोगाची सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक आहे. त्यात हा निर्णय जाहीर होईल असे दिसते.

मार्च/एप्रिल २०२१मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कोरोनाचे जे चित्र समोर आले होते. त्याचे चित्र पाहिले तर त्यातून आगामी निवडणुकीतून कोरोनाची परिस्थिती काय होईल, याचा अंदाज लावता येईल. दोन महिन्यांनंतर मार्चमध्ये उत्तर प्रदेश, गोवा, मणीपूर, पंजाब आणि उत्तराखंड या ठिकाणी विधानसभा निवडणुका होत आहेत. निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी गेल्या महिन्यातच निवडणुकीचे संकेत दिले आहेत. तत्पूर्वी, डिसेंबर २०२१मध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट झपाट्याने पसरत आहे. देशात २ डिसेंबर रोजी ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला. शनिवारी २५ डिसेंबरपर्यंत देशातील एकूण ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ४१५ झाली. एवढेच नव्हे, तर भारतात कोरोनाची प्रकरणे सुद्धा वाढली आहेत.
डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन दुप्पट वेगाने पसरत आहे. यासोबतच तिसºया लाटेचा कळस जानेवारीत किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाणवेल, असा अंदाज आहे. त्यावेळी कोरोनाचे रोज १.५ लाख नवे रुग्ण सापडतील. अशात एप्रिलपर्यंत देशात कोरोनाची सुनामी येऊ शकते. २०२१ च्या सुरुवातीला पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यांत विधानसभा निवडणूक झाली. ही आतापर्यंतची सर्वात लांब विधानसभा निवडणूक ठरली. शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ९००% नी वाढली. २ एप्रिल २०२१ रोजी राज्यात कोरोनाची १७२३ नवीन प्रकरणे समोर आली, तसेच एकाचा मृत्यू झाला होता, तर २ मे २०२१ रोजी पश्चिम बंगालमध्ये एकाच दिवशी १७,५१५ नवे रुग्ण समोर आले, तसेच १०० जणांचा मृत्यू झाला.

निवडणूक झालेल्या इतर राज्यांवर नजर टाकल्यास आसाम, बंगाल, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमध्ये १५ एप्रिल रोजी कोरोनाचे एकूण रुग्ण २६५९४ होते. एकाच महिन्यानंतर १५ मे रोजी हा आकडा ९२,७९४ पर्यंत गेला. यासोबतच मृतांचा आकडा सुद्धा ११२ वरून ६२६ झाला होता. एवढेच नव्हे तर १५ मे रोजी देशभरातील एकूण कोरोना रुग्णांपैकी २९ टक्के रुग्ण याच ५ राज्यांतून होते.
उत्तर प्रदेशात एप्रिल २०२० मध्ये ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. एका महिन्यातच ४ टप्प्यांमध्ये या निवडणुका घेण्यात आल्या. यात ४ एप्रिल ते ४ मे या कालावधीत कोरोनाचे ८ लाख नवीन रुग्ण यूपीत सापडले. एवढेच नव्हे, तर एका संघटनेच्या अहवालानुसार याच कालावधीत जवळपास ७०० शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यातही महत्त्वाचे म्हणजे, हे सगळेच शिक्षक निवडणुकीच्या ड्युटीवर होते. निवडणुकीचे निकाल लागले त्यानंतर ९९ सरपंच उमेदवारांचा याच महिन्यात मृत्यू झाला. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हे चित्र असेल, तर विधानसभा निवडणुकीनंतर ओमिक्रॉनमुळे परिस्थिती आणखी भयंकर होऊ शकते. त्यामुळे सोमवारच्या निवडणूक आयोगाच्या बैठकीकडे आणि पंतप्रधान काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

आगामी ५ राज्यांतील निवडणुकीमुळे कोरोनाचा किती उद्रेक माजणार याचा कुणालाही अंदाज नाही. एक्सपर्टसुद्धा यावर सांभाळून बोलत आहेत. तरीही अनुभवाच्या आधारे त्यांनी या भयंकर परिस्थितीवर सूचक इशारा दिला आहे. कानपूरचे प्राध्यापक मणींद्र अग्रवाल यांच्या मते तिसरी लाट जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येईल. यामध्ये रोज सरासरी १.५ लाख नवे संक्रमित सापडतील. त्याचदरम्यान निवडणुका मार्चमध्ये होणार आहेत. तेव्हा परिस्थिती आणखी भयावह होऊ शकते.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात आतापर्यंत १२.४१ कोटी लोकांनी पहिला डोस घेतला आहे, तर त्यातील ६.७३ कोटी लोकांना लसीचा दुसरा डोस दिला आहे. उत्तर प्रदेशाची एकूण लोकसंख्या २०.४२ कोटी आहे. अशात जवळपास ८ कोटी लोकांनी सिंगल डोससुद्धा घेतलेला नाही.

उत्तराखंडमध्ये ७७.३०लाख लोकांना सिंगल डोस देण्यात आले आहेत. त्यातील ६०.६४ लाख लोकांनी दोन्ही डोस पूर्ण केले. या राज्याची लोकसंख्या १ कोटी आहे. अर्थात २३ लाख लोकांना एकही डोस देण्यात आलेला नाही. मणीपूरमध्ये १४ लाख लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. पंजाबमध्ये ३१ लाख आणि गोव्यात ६ लाख लोकांनी सिंगल डोससुद्धा टोचलेला नाही.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …