निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची रविवारी नवी दिल्लीत बैठक

३०० नेते उपस्थित राहणार
नवी दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या रणनीतीवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक रविवारी (७ नोव्हेंबर) सकाळी ९.३० पासून सुरू होणार असून, दुपारी ४.३० पर्यंत चालणार आहे. भाजपची ही एकदिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भाषणाने सुरू होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने संपेल. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे सुमारे ३०० नेते उपस्थित राहणार आहेत. सर्व राज्यांतील प्रदेशाध्यक्ष, संघटन मंत्री आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकत्रितपणे पक्षाच्या प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधणार आहेत. एकूणच संमेलनाचे स्वरूप ऑनलाइन आणि ऑफलाइन असे असणार आहे.
निवडणुकीच्या तयारीवर चर्चा हा या बैठकीचा मुख्य अजेंडा आहे. या बैठकीत पक्षाध्यक्षांचे भाषण होणार असून, त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीवर चर्चा होणार आहे. यासोबतच एक प्रस्तावही आणला जाईल ज्यामध्ये सर्व राजकीय मुद्दे, आर्थिक आणि परराष्ट्र धोरणाच्या मुद्यांचा समावेश असेल. भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे हायकमांड या राज्यांमध्ये सातत्याने सभा घेत आहेत. सरकारची कामे जनतेपर्यंत नेण्यासाठी भाजप सातत्याने कार्यकर्ता परिषदा घेत आहे. अशा स्थितीत रविवारी होणारी ही बैठक निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …