नितेश राणेंना सत्र न्यायालयाचा झटका

अटकपूर्व जामीन फेटाळला ; उच्च न्यायालयात जाणार
कणकवली (सिंधुदुर्ग) – भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. दोन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी अटकपूर्व जामीन नाकारला. त्यामुळे नितेश राणे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांना हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, असे असले तरी नितेश राणे आता उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. नितेश राणे यांच्या वकिलांकडून तशी माहिती देण्यात आली आहे.
नितेश राणे अद्याप पोलिसांसमोर दाखल झालेले नाहीत. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता नितेश राणे पोलिसांसमोर हजर होणार का? किंवा पोलीस नितेश राणेंना अटक करणार का?, असा सवाल केला जात आहे. मात्र, नितेश राणे यांना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. जामीन मिळविण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाऊ. तोपर्यंत नितेश राणेंना पोलिसांसमोर हजर होण्याची गरज नाही, असे नितेश राणेंचे वकील ॲड. संग्राम देसाई यांनी म्हटले आहे. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक केली, तर आम्ही जामिनासाठी अर्ज करू असेही त्यांनी म्हटले आहे.
ॲड. संग्राम देसाई म्हणाले की, आमच्यापुढे उच्च न्यायालयात जाणे हा पर्याय आहे. त्यावर योग्य ती चर्चा करून एक-दोन दिवसांत निर्णय घेऊ. मात्र, शक्यतो शुक्रवारीच आम्ही उच्च न्यायालयात केस दाखल करू. ती बोर्डावर यायला वेळ लागेल. दोन-तीन दिवस तरी लागतील. नितेश राणे यांनी आतापर्यंत पोलिसांना सहकार्य केले आहे आणि इथून पुढेही आम्ही पोलिसांना सहकार्य करू, असे देसाई म्हणाले. संग्राम देसाई पुढे म्हणाले की, न्यायालयाने नितेश राणे यांचा मोबाइल जप्त करून कस्टडी मागितली आहे. मात्र, आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. तिथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करणार आहोत. तिथे सुनावणी होईपर्यंत आम्हाला बाजूला राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नितेश राणे काही शरण वगैरे येणार नाहीत. मात्र, पोलिसांना तपासात आजपर्यंत सहकार्य केले आहे आणि मदत मागितली तरी ती करू, असे ते म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …