नितेश राणेंना तूर्तास अटक नाही

जामिनावर शुक्रवारी सुनावणी
मुंबई – सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे, तसेच तोपर्यंत नितेश राणेंना अटक करण्यात येणार नसल्याची ग्वाही न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना तूर्तास अटक होणार नसून, आता त्यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी (७ जानेवारी) सुनावणी होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांची अटकपूर्व जामिनाची याचिका फेटाळून लावल्यानंतर त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मंगळवारी त्यावर सुनावणी झाली. यावेळी नितेश राणे यांचे वकील नितीन प्रधान यांनी त्यांची बाजू मांडली, तर सरकारी वकिलांनीही नितेश राणे हेच संतोष परब हल्ला प्रकरणातील सूत्रधार असल्याचे न्यायालयाला सांगितले. नितेश राणे हेच हल्लाप्रकरणातील सूत्रधार असल्याने त्यांना कोणत्याही परिस्थितीत अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, तसेच कोर्टाच्या रेकॉर्डवर या गुन्ह्याशी संबंधित अनेक गोष्टी येण्याची गरज आहे. त्यामुळे या संपूर्ण बाबी प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात मांडण्यासाठी सरकारी वकिलांकडून कोर्टाकडे वेळ मागून घेण्यात आली. त्याचवेळी प्रतिज्ञापत्र दाखल होईपर्यंत नितेश राणे यांना अटक करण्यात येणार नसल्याची ग्वाहीही राज्य सरकारने न्यायालयाला दिली.
त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर शुक्रवारी (७ जानेवारी) दुपारी अडीच वाजता सुनावणी होणार आहे. त्यावेळी दोन्ही बाजूंचे वकील काय युक्तिवाद करतात आणि नितेश राणेंना जामीन मिळतो का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …