- लाड यांची कारवाईची मागणी
मुंबई – भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर आता नितेश राणे यांच्याविरोधात मुंबईत पोस्टरबाजी करण्यात आल्याचे पाहण्यास मिळाले. मुंबईत चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात लावलेले पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरवर नितेश राणे यांचा एक फोटो असून, ते हरवले आहेत. त्यांना शोधून काढणाऱ्याला कोंबडी बक्षीस देण्यात येईल, असे म्हटले आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपकडून राणेंच्या समर्थनार्थ होर्डिंग लावण्यात आले आहेत, मात्र नितेश राणेंच्या विरोधात लावलेल्या या पोस्टरचा भाजपने निषेध केला आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड हे या घटनेबाबत माटुंगा पोलीस स्थानकात गेले होते. सरकारला घाबरून हे काम चालले आहे का?, असा संशय आमच्या मनात असल्याचे प्रसाद लाड यावेळी म्हणाले. ज्यांनी हे पोस्टर लावण्याचे कृत्य केले आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यामागे कोणाचा हात आहे, हे कळले पाहिजे. हे पोस्टर सगळीकडे सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. आम्हाला पोलीस सहकार्य करतील, अशी अपेक्षा असल्याचे यावेळी प्रसाद लाड यांनी सांगितले.