नायगावच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा श्रीगणेशा

दोन इमारती पाडण्यास सुरुवात


मुंबई – बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नायगावमधील प्रत्यक्ष पुनर्विकासाच्या कामाला नव्या वर्षात सुरुवात करण्यात आली आहे. नायगावमधील दोन इमारती पाडण्याच्या कामाला मंगळवारी, ४ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. इमारतींचे पाडकाम पूर्ण झाल्यानंतर तेथे नव्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. पुनर्विकास टप्प्याटप्प्याने पूर्ण होताना ऐतिहासिक बीडीडी इमारती काळाच्या पडद्याआड जाणार आहेत.
१०० वर्षांहून अधिक जुन्या अशा वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन २०१७ मध्ये झाले, मात्र अनेक कारणांमुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. वरळीतील कामाला जुलै २०२१ मध्ये सुरुवात झाली, तर आता नायगावमधील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात करण्यात येत आहे. मुंबई मंडळाने अखेर नायगावमधील इमारत क्रमांक ५ ए आणि ८ मधील १०० टक्के रहिवाशांचे स्थलांतर केले आहे. त्यामुळे या दोन्ही इमारती पाडण्याचा मार्ग मोकळा झाला. या दोन्ही इमारतींचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे. इमारतींचे पाडकाम एल अँड टी कंपनीमार्फत करण्यात येत आहे. इमारतींचे पाडकाम पूर्ण झाल्यानंतर जागा मोकळी करून पुढे प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली जाणार आहे. नायगावमधील अंदाजे १६० रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे, तर ना. म. जोशी मार्ग येथील २७२ हून अधिक रहिवाशांचे स्थलांतर पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत बीडीडीकर पुनर्विकसित इमारतीतील घरात प्रवेश करतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
पाच वर्षांत बीडीडी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करणार – आव्हाड
येत्या ४ ते ५ वर्षांत बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करणार असून, रहिवाशांनी सहकार्य केले, तर लवकर प्रकल्प पूर्ण होईल, असे मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. पाडकामाला सुरुवात झाल्यानंतर अनेक रहिवासी भरल्या डोळ्याने आपल्या वास्तूला ढासळताना पाहत होते. तर काही जण पुनर्विकासाचे करारपत्र, कॉर्पस फंड, याबाबत म्हाडा कधी चर्चा करणार याबाबत विचारणा करीत होते. गृहनिर्माण मंत्र्यांनी याबाबत येत्या गुरुवारी बैठक आयोजित करून रहिवाशांच्या शंकांचे निरसन करणार असल्याचे स्पष्ट केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …