नागपूर – नागपूर महानगरपालिकेतील स्टेशनरी घोटाळा सध्या मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या घोटाळ्यात साहित्याचा पुरवठा न करता ६८ लाखांचे बिले उचलण्यात आले. कोरोना काळात हा घोटाळा झाल्याचे समोर आले. यात तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी मनपाचे तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष आणि भाजप नगरसेवक पिंटू झलके यांनी केली. मनपात झालेल्या घोटाळ्यात प्रशासकीय प्रमुख म्हणून आयुक्तांची जबाबदारी आहे. त्यामुळे चौकशीची मागणी केली, असे पिंटू झलके यांनी स्पष्ट केले.
हा वाद म्हणजे भाजप विरुद्ध तुकाराम मुंढे असा असल्याचे देखील बोलले जाते. तुकाराम मुंढेंनी भाजपच्या काही कंत्राटदारांना दुखावले होते. त्यांचे कंत्राट रद्द झाले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी अशी मागणी केली असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र पालिका अधिनियमांचे कलम २४ च्या पोटकलम दोन अन्वये स्थायी समितीला चौकशी समिती स्थापन करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार स्टेशनरी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी स्थायी समितीची उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला, पण आयुक्तांनी त्याला मंजुरी नाकारली आहे. याबाबत त्यांनी निगम सचिवांना पत्र पाठविल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी पत्रकारांना दिली. प्रकाश भोयर म्हणाले की, स्टेशनरी घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. कंत्राटदाराची गेल्या कितेक वर्षांपासून अशी दुकानदारी सुरू आहे. घोटाळ्यात वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत. तेव्हा त्यांची चौकशी कशी करणार, असा प्रश्न प्रकाश भोयर यांनी उपस्थित केला.