ठळक बातम्या

नांदेड : वीज प्रश्न पेटला; अख्खे गाव बैल-बारदाण्यासह महावितरणच्या दारी

नांदेड – महावितरणच्या योजनेचा सर्वाधिक लाभ घेतलेल्या नांदेड जिल्ह्यातीलच एका गावाने कारभाराबद्दल रोष व्यक्त करीत थेट बैल-बारदाणा, ट्रॅक्टर घेऊन महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. कृषी पंपांच्या थकबाकीपोटी प्रतिपंपानुसार २० हजार रुपये भरण्याची तयारी दर्शवूनही विद्युत पुरवठा सुरू केला जात नसल्याने शेतकऱ्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली. अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील कृ षी पंपांचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे गुरांना पिण्यासाठी पाणी नाही, तसेच पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वीज वितरण कंपनीने शेतीची वीज सुरू करावी, या मागणीसाठी गावकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढला.
यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने पाणीसाठा मुबलक आहे, मात्र पिकांना पाणी देण्याचे तर सोडाच, पण विद्युत पुरवठाच खंडित असल्याने विहिरीतील पाण्याचा उपसा करणेही शक्य होत नाही. त्यामुळे पाण्यावाचून जनावरांचे हाल होत आहेत. किमान काही वेळ ठरवून विद्युत पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती, मात्र याकडेही दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे जनावरांना दोन वेळचे पाणी देणेही मुश्किल झाले आहे. दरवर्षी पाणी नसल्याने पिकांचे नुकसान होत असते, तर यंदा विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने पिके करपू लागली आहेत. त्यामुळे गुरुवारी कोंढा येथील शेतकऱ्यांनी बैलगाडी, ट्रॅक्टरसह मोर्चा काढला. या मोर्चात महिला व बालकांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते.
कोंढा गावातील शेतकऱ्यांनी एका कृ षीपंपाच्या थकबाकीपोटी २० हजार रुपये अदा करण्याची तयारी दर्शवली होती, मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्वच थकबाकी तीदेखील एकरकमी अदा करण्यास सांगितले. त्यामुळेच संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चा काढून महावितरणबाबत रोष व्यक्त केला.
आतापर्यंत अतिवृष्टी, अवकाळी यामुळे खरिपाचे आणि आता रब्बी हंगामातील पिकांचेही नुकसान होत आहे. दुसरीकडे मुबलक पाणी असतानाही त्याचा उपयोग ना पिकांसाठी, ना जनावरांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी होत आहे. महावितरण कंपनीकडून वसुली मोहीम सुरू आहे, पण शेतकरी बिल अदा करण्याची भूमिका घेत असतानाही एकरकमीच सर्व बिल अदा करून घेण्याचा अट्टाहास का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …