मुंबई – मुंबईकरांसाठी बहुप्रतिक्षित असलेल्या वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात होणार आहे. या वॉटर टॅक्सीद्वारे मुंबई ते नवी मुंबई असा प्रवास अत्यंत कमी वेळेत करता येईल. आतापर्यंत मुंबईहून नवी मुंबईपर्यंत केवळ रस्ते आणि रेल्वेमार्ग उपलब्ध होता, आता मुंबईकरांना जलमार्गे प्रवासाचीही सुविधा उपलब्ध होणार आहे. मुंबई ते नवी मुंबईपर्यंत रस्ते मार्गाने जाण्यासाठी टॅक्सीद्वारे सव्वातास ते पावणेदोन तास असा वेळ लागतो, मात्र नव्या वॉटर टॅक्सीद्वारे हा वेळ ३० मिनिटांपेक्षा कमी लागेल, तसेच मुंबईच्या वाहतुकीवरील ताणही कमी होऊ शकेल.
मुंबई ते नवी मुंबईतील दोन जेट्टीदरम्यान या वॉटर टॅक्सीद्वारे प्रवाशांना प्रवास करता येईल. यात जेएनपीटी येथे एक स्टॉप असेल. दुसरी सेवा मुंबई ते रायगड जिल्ह्यातील रेवसदरम्यान असेल. या जलमार्गाची ही सेवा खासगी ऑपरेटरकडे सोपवण्यात आली असून, या सुविधांसाठीचे भाडे काहीसे महाग आहे. सध्या याचे भाडे प्रति प्रवासी, प्रति मिनिट, ४५ रुपये एवढे ठरवण्यात आले आहे. म्हणजेच मुंबई ते नवी मुंबईचे भाडे १२०० ते १५०० रुपयांदरम्यान असेल, तर जेएनपीटीपर्यंतचे भाडे ७५० रुपये असू शकते, अशी माहिती इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस एलएलपीचे सोहेल कझानी यांनी दिली.
मुंबई ते नवी मुंबईदरम्यान असलेली जलवाहतूक सेवा वर्षातील ३३० दिवस सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत असेल. पावसाळ्यात सेवा बंद राहील. या सुविधेकरिता सध्या ५० आसनी, ४० आसनी, ३२ आसनी आणि १४ आसनी अशी चार जहाजे आहेत. याद्वारे २५ नॉट्सच्या वेगाने प्रवास करता येऊ शकतो. प्रवाशांना या जेट्टीपर्यंत येण्यासाठी चर्चगेट, सीएसएमटी, नरिमन पॉइंट, गेट वे ऑफ इंडिया, डीसीटी, डॉकयार्ड, बेलापूर, नेरूळ आणि जेएनपीटी अशा विविध ठिकाणी पूल कॅब असतील. या शेअर अ कॅब तत्वावर असतील. त्यासाठी प्रति व्यक्ती २० ते ३० रुपये भाडे आकारले जाऊ शकते, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि सिडको यांनी एकत्रितपणे या प्रकल्पासाठी काम केले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने मुंबईतील फेरी वार्फ येथे डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल उभारले, तर सिडकोने नवी मुंबईतील बेलापूर आणि नेरूळ येथील टर्मिनलचे बांधकाम केले. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन केले जाईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई पोर्ट ट्रस्टमधील केमिकल टर्मिनलचेही उद्घाटन करतील आणि बंदरातील दुसऱ्या केमिकल टर्मिनलचे भूमिपूजन करतील.