नवे क्षितीज गाठताना, बळ मिळो पंखांना!

 

  • राकेश ग. खेडेकर
    ९८९२२९९४४१

पाहता पाहता, वर्षातील अखेरचा महिना आला. मग काय, अनेकांना नव्या वर्षाची चाहूल लागली असेल. अनेकांनी नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी केली असेल, पण या अनेकांमध्ये असे काही जण आहेत, ज्यांच्यासाठी दिवस काय?, रात्र काय? आठवडा, महिना किंवा वर्ष काय? सर्व समान. त्यांचे एकमेव उद्दिष्ट एकच! ते म्हणजे यावेळच्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करणे. मुळात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वेळापत्रक अत्यंत काटेकोरपणे साकारलेले असते. काही मोजक्या तासांची झोप वगळता, हे विद्यार्थी कायम पुस्तकात डोकावलेली असतात. विविध विषयांचा सराव करता-करता त्यांना ना थकवा येतो ना कंटाळा. एखाद्या झपाटलेल्या व्यक्तीप्रमाणे ते लक्षाचा पाठलाग करतात. त्यात खऱ्या अर्थानं मेहनत घेणारा विद्यार्थी हा केव्हाच, कोणत्याही लोभास बळी पडत नाही. पूर्व असो वा मुख्य परीक्षेची तारीख व तिथपर्यंत अभ्यास पूर्ण करण्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड, हेच त्यांच्या यशाचे खरे गमक असते. पण २०१९-२० व २०२०-२१ हे वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत वाईट असेच गेले. २०१९ च्या मुख्य परीक्षा असो वा मुलाखती. ज्यांचे वेळापत्रक आता २०२१च्या अखेरीस येत आहेत. या सर्व गोष्टींचा फटका विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर पडला, पण २०२१च्या मध्यानंतर काही प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी अनेक चांगल्या गोष्टी घडू लागल्या, ज्यामुळे नवे क्षितीज गाठताना, त्यांच्या पंखांना बळ मिळतानाचे, सध्या तरी चित्र आहे.

मला अधिकारी व्हायचेय!

मी एका स्पर्धा परीक्षेच्या सेमिनारला गेलो होते. अनेकवेळा आपणास मार्गदर्शकाची कमतरता भासते. त्यामुळे अशाप्रकारचे सेमिनार गाठणे हाच एकमेव पर्याय असतो. एमपीएससीची परीक्षा दिली की, सरकारी कार्यालयात नोकरी मिळते? हिच काय ती तुटकी-फुटकी माहिती अनेकांकडे असते, पण झाडाच्या प्रत्येक मुळाला अनेक फाटे असतात. हिच मुळं, झाडाला अनेक वादळात खंबीरपणे उभं राहण्याचे बळ देतात. त्यामुळे आपणास स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, आपण नेमकं काय करणार आहोत, त्याच्या मुळापर्यंत पोहचणे गरजेचे असते, जे मार्गदर्शकांशिवाय सोप्पे नाही. मी ज्या सेमिनारला उपस्थित होतो, तेथे एक प्रशासकीय पदावरील मोठे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी व्यासपीठावर प्रवेश घेताच ‘कसं काय अधिकारी मित्रांनो’ अशी हाक दिली. एकप्रकारे आत्मविश्वास वाढवण्यासाठी म्हणा किंवा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा मूळ गाभारा कळावा म्हणून म्हणा, त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसाठी ‘अधिकारी’ या शब्दाचा वापर केला. पण अधिकारी होणं ही काही सोप्पी बाब नाही, हे देखील त्यांनी आम्हाला पुढील एक ते दोन तासांत समजावले. हा किस्सा सांगण्या मागचे कारण की, एखाद्या सरकारी आस्थापनेत चांगल्या हुद्याची नोकरी मिळावी, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी फक्त आरक्षण किंवा पैसा हेच पुरेसे पडत नाही. तर त्यासाठी लागते, १२ ते १८ तास शिक्षणासाठी द्यावी लागणारी वेळ. हातात शिल्लक असणाऱ्या मोजक्या काही महिन्यांत आपणास जगभरातील विविध विषयांचे ज्ञान अवगत करावयाचे असते. ज्याच्या जोरावरच आपण पूर्व व मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळवू शकता.

२०२२-२३ असेल सुवर्ण काळ

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी त्यांच्या अंदाजित वेळापत्रकाची माहिती असतेच. एमपीएससीच्या वेबसाइटवरही वेळोवेळी अपडेट दिले जातात. तसे पाहता, अनेकांनी आगामी वर्षातील परीक्षेच्या तारखांचा आढावा घेतला असेलच. या सर्व गोष्टींचा विचार करता, अंदाजित वेळापत्रकात राज्य सेवा परीक्षा २०२१ ची पूर्व परीक्षा ही २ जानेवारी, २०२२ मध्ये पार पडणार आहे. म्हणजे यशस्वीपणे अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची तयारी ही आता शेवटच्या टप्प्यावर असेल. मार्च महिन्यात निकाल लागल्यानंतर ७, ८ व ९ मे रोजी म्हणजेच एका महिन्याच्या कालावधीत मुख्य परीक्षा ठेवण्यात आल्या आहेत. याचा निकाल ऑगस्टमध्ये लागेल. सध्या तरी हे अंदाजित वेळापत्रक म्हणूनच दाखवत असले, तरी त्या दिशेने अभ्यास केल्यास उत्तमच. इतर अंदाजित वेळापत्रकांकडे लक्ष दिले असता, बहुतेक पदाच्या स्पर्धा परीक्षा या फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, जून, ऑगस्ट, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर अशा हाकेच्या अंतरावर पाहण्यास मिळत आहेत. यातील अनेक पदांच्या जाहिराती आल्या असून, अनेकांच्या जाहिराती यायच्या शिल्लक आहेत. तर अनेक परीक्षांच्या तारखाही जाहीर व्हायच्या आहेत. त्यामुळे २०२२-२३ हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एखादं ‘पद’ प्राप्त करण्यासाठी सुवर्ण काळ असेल. त्यामुळे ज्यांना स्पर्धा परीक्षेबाबत माहीत नसेल, त्याच्या तारखा माहीत नसतील, तर प्रथमत: त्यांनी एमपीएससीच्या वेबसाईटला भेट देणे गरजेचे आहे. काहीच नाही कळाले, तर एखाद्या मार्गदर्शकाला किंवा त्याबाबत जाणकार असलेल्या व्यक्तीला ती माहिती विचारणे फायद्याचे ठरेल.

एमपीएससीचा अनागोंदी कारभार

भारतात कोरोना आला व बहुतेक सरकारी व खासगी आस्थापने ठप्प झाली. काही कोविड-१९ च्या काळात सेवा देत होती. काहींना मात्र त्यावर बंधन होती. ज्यात लोकसेवा आयोगाचा समावेश होता, ज्यांचा कारभार पूर्णपणे मंदगतीने सुरू झाला. स्पर्धा परीक्षेला बसणारे लाखो विद्यार्थी पाहता, सर्व काही सुरळीत होण्याची त्यांनी वाट पाहिली. हा वेळ एवढा होता की, २०१८-१९ च्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुढील प्रक्रियेबाबत विचार करण्यास ही ते कमी पडले. कासवाच्या पावलांनी चालणारा प्रशासकीय कारभार कसा असतो, याचे उदाहरण अनेकवेळा एमपीएसच्या कार्यप्रणालीकडे पाहून मिळते. आपण घेत असलेल्या निर्णयांवर ठामपणे कार्य करण्यास देखील ते अपयशी ठरले. याचा फटका पडला, तो थेट विद्यार्थ्यांना. दुर्दैवाने अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या काळात व मागच्या काही महिन्यात हताश होऊन आपली जीवनयात्रा संपवली. यासाठी प्रशासकीय व्यवस्था जबाबदार की, उज्ज्वल भविष्याची असंख्य स्वप्न पाहणारे विद्यार्थी हे न उलगडणारे कोडं आहे. पण काहीही असो, अनागोंदी कारभाराचं ओझं किती दिवस डोक्यावर वाहायचं, याचा विचार केव्हा तरी एमपीएसला करणे गरजेचे आहे. दुसरीकडे, विद्यार्थ्यांनी संयमपणा दाखवणं गरजेचं आहे. आपले जीवन ही काही स्वस्त गोष्ट नाही. ही परीक्षा आहे. ज्यात उत्तीर्ण-अनुत्तीर्ण ही प्रक्रिया पार पडणारच. यश प्राप्त करण्यासाठी आपल्यासमोर अनेक उदाहरण असतात. आपण देशाचं भविष्य असून, आपण ‘बॅकफूट’ला जाऊन खेळू शकतो, याचा विसर केव्हाच पडू नये.

सध्या स्पर्धा परीक्षांबाबत सुरू असलेले घोटाळे किंवा प्रशासनाची चाल-ढकल पद्धत हेच काय ते विद्यार्थ्यांच्या मार्गात निर्माण होणारे अडथळे आहेत. पण प्रत्येक अंधारामागे, उजेड हा दडलेला असतो. त्यामुळे भूतकाळात काय घडले, त्यापेक्षा भविष्यात काय घडणार? हा विचार जास्त केल्यास स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती यशाची गुरुकिल्ली ठरू शकते. कोरोनाचा काळ मागे सरत असून, आता आयोगानेही अनेक परीक्षांच्या तारखा हळूहळू का होईना, जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण उज्ज्वल महाराष्ट्र व उज्ज्वल भारताच्या विकासासाठी महत्त्वाचे आहात. त्यामुळे चांगल्या गुणांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे, हेच एकमेव ध्येय आपण मनाशी बाळगावे.

 

 

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …