नवी दिल्ली – सध्या ऑनलाईनच्या या जगात एटीएममधून पैसे काढणे सर्व सामान्य माणसांच्या अंगवळणी पडले आहे. अशात येत्या नव्या वर्षात एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे. एटीएममधून ट्रान्झेक्शनच्या नियमांमध्ये बँक १ जानेवारीपासून बदल करणार आहे. यामध्ये ट्रान्झेक्शनच्या शुल्क वाढीचाही समावेश आहे. एटीएम फ्री ट्रान्झेक्शनच्या मर्यादेनंतर एटीएम ट्रान्झेक्शनवरील शुल्क वाढवण्यास रिझर्व्ह बँकेनेही मंजुरी दिली आहे. त्यानुसार एटीएमच्या फ्री लिमिटनंतर केल्या जाणाऱ्या ट्रान्झेक्शवर १ जानेवारीपासून अधिक शुल्क भरावा लागणार आहे. नवीन नियमांनुसार ग्राहकांना फ्री एटीएम ट्रान्झेक्शन मर्यादेनंतरच्या ट्रान्झेक्शनवर २१ रुपये शुल्क आणि जीएसटी द्यावा लागणार आहे. सध्या हे शुल्क २० रुपये इतके आहे. आरबीआयने १ जानेवारी २०२२ पासून बँकांना रोख आणि नॉन-कॅश एटीएम व्यवहारांवर मोफत मासिक मर्यादेपेक्षा जास्त शुल्क वाढवण्याची परवानगी दिली आहे. आरबीआयच्या सूचनेनुसार, बँकांनी आपल्या ग्राहकांना १ जानेवारी २०२२ पासून २१ रुपये शुल्क भरावे लागतील याची माहिती देणारा एसएमएस पाठवणे सुरू केले आहे. या वर्षी १ ऑगस्ट २०२१ पासून, आरबीआयने आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहार शुल्क १५ रुपयांवरून १७ रुपये आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहार ५ रुपयांवरून ६ रुपये केले आहे. जास्त इंटरचेंज फी आणि ऑपरेटिंग कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे आरबीआयने बँकांना ग्राहकांकडून प्रति व्यवहार २१ रुपये शुल्क आकारण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे बँकांनी शुल्कात वाढ केली आहे.