मुंबई – मराठा आरक्षणासोबतच मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्यात आला होता, परंतु हे प्रकरण न्यायालयात गेले. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेवर बोलत आहेत. ते या पार्श्वभूमीवर मुस्लिमांना आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका मांडत मुस्लिमांची दिशाभूल करत असल्याचा आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मुस्लिमांना आरक्षण मिळू नये, अशी संघाची भूमिका आहे. मलिक यांचीही भूमिका संघासारखी आहे. आता मलिकही याच बोटीतून प्रवास करताना दिसत आहेत, असा टोला आंबेडकर यांनी लगावला.
राष्ट्रवादी आणि भाजपचे संबंध सर्वांना माहिती आहेत. नवाब मलिक राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्याने ते ही भूमिका राष्ट्रवादीची आहे, असे म्हणाले. मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण लागू करावे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे आता प्रत्येक समाजाने मेळावे घ्यायला हवेत. त्याबाबतची जनजागृतीही करायला पाहिजे. इम्पेरिकल डेटा गोळा का केला नाही, याचा जाब विचारून सरकारची पोलखोल केली पाहिजे. गोवारी समाजासारखी अवस्था होऊ नये, असे ओबीसींना वाटत असेल, तर त्यांनी समाजात जागृती करायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
आम्ही ओबीसींच्या आरक्षणासाठी मोर्चा काढला. आता जिल्हा पातळीवर गावापर्यंत मोर्चे काढण्याची आमची तयारी सुरू आहे. ओबीसींना आरक्षणासाठी राजकीय भूमिका घेण्याची वेळ आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेने आमच्याकडे मते मागायला येऊ नये, असे बोर्डच ओबीसींनी आपल्या घरावर लावले पाहिजे. मत हवे असेल तर आमचे आरक्षण आम्हाला परत करा, अशी मागणी ओबीसींनी लावून धरली पाहिजे. ओबीसींना आरक्षण मिळावे आणि या लढ्याला वेग मिळावा म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …