धोनीला भेटण्यासाठी चाहत्याने केली १४३६ किमीची पदयात्रा!

रांची – टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे करोडो चाहते आहेत. तर काही जणांचा स्वत: धोनी एका भेटीत चाहता होतो. अजय गिल असाच एक धोनीचा जबरदस्त फॅन आहे. धोनीची फक्त एक भेट मिळावी म्हणून त्याने हरियाणातून रांचीपर्यंत १४३६ किलोमीटर पायी प्रवास केला. धोनीनेही त्याची ही इच्छा पूर्ण केली. त्याचबरोबर त्याची गळाभेट घेत ‘आय लव्ह यू’ असेही म्हटले.
धोनीने फक्त त्याची भेटच घेतली नाही, तर त्याला घरातही बोलावले. तसेच त्याच्यासोबत सेल्फी देखील काढली. त्याच्या राहण्याची व्यवस्थाही धोनीने स्वत:च्या फार्म हाऊसमध्ये केली होती. अजयच्या बॅटवर धोनीने स्वाक्षरी केली. तसेच त्याला परत जाण्यासाठी विमानाच्या तिकिटाची व्यवस्था देखील धोनीनेच केली.
हरियाणातील जलान खेड्यामध्ये राहणारा १८ वर्षांचा अजय गिल हा धोनीचा जबरदस्त फॅ न म्हणून प्रसिद्ध आहे. धोनीला भेटण्यासाठी त्याने ३ महिन्यांत दुसऱ्यांदा रांचीपर्यंत पदयात्रा काढली आहे. यापूर्वी त्याने १६ दिवसांमध्ये १४३६ किलोमीटर अंतर पार केले होते. यंदा त्याला हा प्रवास करण्यासाठी १८ दिवस लागले. माहीला भेटल्यानंतर आपले आयुष्य धन्य झाले, अशी भावना अजयने व्यक्त केली आहे.
अजयने यावेळी सांगितले की, मी क्रिकेट खेळतो आणि यामध्येच मला करिअर करायचे आहे. महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यावेळी धोनीची भेट होईपर्यंत क्रिकेट खेळणार नाही, अशी प्रतिज्ञा मी केली होती. आता ती प्रतिज्ञा पूर्ण झाली आहे. मला धोनीचा आशीर्वाद मिळाला असून आता मी पुन्हा एकदा क्रिकेट खेळायला सुरुवात करणार आहे, असे अजयने सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …