धारावीतील बोगस लसीकरण प्रमाणपत्र रॅकेट उद्ध्वस्त

मुंबईबाहेर न जाता बिहारमध्ये व्हायचे लसीकरण

मुंबई – एक हजार रुपयांच्या मोबदल्यात बोगस लसीकरण प्रमाणपत्र देणारे रॅकेट धारावी पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. विशेष म्हणजे या बनावट प्रमाणपत्राची नोंदणी कोविन ॲपवरसुद्धा दिसत होती. तसेच हे लसीकरण मुंबईबाहेर कुठेही न जाता बिहारमध्ये झाल्याचे प्रमाणपत्र या टोळीकडून देण्यात येत होते. याप्रकरणी सायबर कॅफे मालकाला अटक करण्यात आली आहे.
धारावीमध्ये लसीकरणाच्या बनावट प्रमाणपत्राची एक हजार रुपयांत सर्रास विक्री करण्यात येत होती. लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याच्या प्रमाणपत्राची सर्रास विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात धारावीतील सेकारन फ्रान्सिस नाडर (३६) हा सायबर कॅफे मालक बनावट लसीकरण प्रमाणपत्र देत असल्याची माहिती मिळाली. नाडर हा अवघ्या एक हजार रुपयांमध्ये कोरोना लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र देत होता. एक बोगस ग्राहक पोलिसांनी नाडरकडे पाठवला. नाडरने त्याला लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर धारावी पोलिसांनी त्याला रंगेहात पकडून बुधवारी अटक केली. पोलिसांनी पाठवलेला ग्राहक मुंबईत असतानाही बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. आरोपीकडे पाठवण्यात आलेल्या ग्राहकाने लस घेतल्याचे प्रमाणपत्र कोविन या संकेतस्थळावर दिसत असल्याने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. अधिकृतरित्या लसीकरण केल्यावर दोन मात्रांमधील बॅच क्रमांक वेगवेगळा असतो; पण या प्रकरणात दोन्ही मात्रा एकाच बॅचमध्ये झाल्याचे दिसत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …