धक्कादायक! ‘लिव्ह इन पार्टनर’च्या बाळाचा ५ लाखांत सौदा

 

कथित बापासह ११ जणांना अटक

मुंबई – मुंबईच्या व्ही. पी. रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या आपल्या पार्टनरचे बाळ तब्बल पाच लाखांना विकले. पीडित चिमुकलीची आई कामानिमित्त बाहेर गेल्याने आरोपीने तिच्या बाळावर डल्ला मारला. याप्रकरणी पोलिसांनी तथाकथित बापासह एकूण अकरा जणांना ताब्यात घेतले आहे, तसेच चार दिवस कसून तपास केल्यानंतर, विकण्यात आलेल्या चिमुकलीला तामिळनाडूच्या कोईमतूरमधून ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चार महिन्यांच्या चिमुकलीची आई गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्त बाहेरगावी गेली आहे. त्यामुळे तिने आपल्या बाळाला घर मालकीण अन्वरी शेख यांच्या ताब्यात दिले होते, तर संबंधित महिलेचा लिव्ह इन पार्टनर आणि मुख्य आरोपी इब्राहिम शेख हा देखील घरीच होता. मागील काही दिवसांपासून घर मालकीण अन्वरी शेख याचे या बाळाची काळजी घेत होत्या; पण आरोपी इब्राहिम याने बाळाला लस द्यायची असल्याचे सांगून अन्वरी यांच्या ताब्यातून बाळाला घेतले आणि गायब झाला. इब्राहिम बाळाला घेऊन परत न आल्याने ३ जानेवारी रोजी घर मालकीण आणि केअर टेकर अन्वरी शेख यांनी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात जाऊन इब्राहिम शेख याने बाळाला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. हे प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली. पोलिसांनी सर्वप्रथम मुख्य आरोपी आणि तथाकथित बाप इब्राहिम याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मालाड, जोगेश्वरी, नागपाडा, सायन, कल्याण, धारावी आणि ठाण्यात छापेमारी करत २ महिला आणि ४ पुरुषांना ताब्यात घेतले. संबंधित आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी बाळाला कर्नाटक, तामिळनाडूमध्ये विकल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार, दोन पोलीस पथके कर्नाटक आणि तामिळनाडूला रवाना झाले. पोलिसांनी सलग चार दिवस माग घेत तामिळनाडूतील कोईमतूर येथून बाळाला ताब्यात घेतले, तसेच येथून एक महिलेसह पाच जणांना ताब्यात घेतले. या सर्वांची कसून चौकशी केली जात असून, आरोपींनी अशाच प्रकारे आणखी बऱ्याच बाळांना विकले असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …