ठळक बातम्या

दोन लाखांचा पट्टा व पाच लाखांची पँट! वानखेडे म्हणतात ‘ती फक्त अफवा’

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक व एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यातील वाद हा वाढतच चालला आहे. मलिकांच्या रोज नव्या आरोपांवर वानखेडे आपल्या अंदाजात उत्तर देतानाचे चित्र असून, शनिवारी मलिकांनी वानखेडे यांच्या लाइफ स्टाइलवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वानखेडे अनेक वस्तू महागड्या वापरतात, असा दावा मलिकांनी केली. ज्यावर या सर्व अफवा असल्याची प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिली आहे.

मलिक यांनी शनिवारी असा दावा केला की, एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा शर्ट हजार-पाचशेपेक्षा महागडा नाही; पण समीर वानखेडेचा शर्ट ७० हजार रुपयांचा का असतो? प्रत्येक दिवशी नवे कपडे घालतात. मोदींच्याही पुढे गेलेत. पँट लाख रुपयांची, पट्टा २ लाखांचा, बुट अडीच लाखांचे, घड्याळ ५०, ३०, २५ लाख रुपयांचे. मी याचे सर्व फोटो तुम्हाला देईन. या सर्व काळात त्यांनी जशा प्रकारचे कपडे घातलेत त्याची किंमतच ५-१० कोटी रुपये आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. त्यावर समीर वानखेडे प्रत्युत्तर देताना म्हणाले की, माझ्या महागड्या कपड्यांचं म्हणाल, तर ही फक्त एक अफवा आहे. नवाब मलिक यांना याविषयी फार कमी माहिती आहे. त्यांनी याविषयी खरी माहिती शोधून काढायला हवी, तसंच यावेळी वानखेडे यांनी ड्रग्ज रॅकेटच्या आरोपांना देखील उत्तर दिले, तसेच त्यांच्या बहिणीवर देखील नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर त्याविषयी समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, सलमान नावाच्या एका ड्रग्ज पेडलरनं माझ्या बहिणीची भेट घेतली होती; पण ती एनडीपीएसच्या केसेस हाताळत नसल्यामुळे तिने त्याला परत पाठवले. त्यानंतर सलमानने आम्हाला एका मध्यस्थाकरवी जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्याला नंतर अटक झाली असून, तो सध्या तुरुंगात आहे. त्याचं व्हॉट्सॲप चॅट शेअर करून चुकीचे आरोप केले जात आहेत. दरम्यान, यावेळी समीर वानखेडेंनी ड्रग्ज माफिया सातत्याने आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला. ते म्हणाले, ज्याने आम्हाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता, त्या मध्यस्थाने मुंबई पोलिसांत यावर्षी एक खोटी तक्रार दाखल केली होती. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर सलमानसारख्या पेडलर्सचा वापर करून माझ्या कुटुंबाला अडकवण्याचा देखील प्रयत्न झाला. असे प्रयत्न अजूनही होत आहेत. या सगळ्यांच्या मागे ड्रग्ज माफिया आहेत, असा दावा समीर वानखेडे यांनी केला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …