कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा
मुंबई – एसटी कामगारांचे जसे आमच्यावर दायित्व आहे, तसेच जनतेचेही दायित्व आमच्यावर आहे. त्यामुळे एसटी कामगारांनी आणखी ताणून धरू नये. त्यांनी कामावर परतावे. दोन महिन्यांचा पगार मिळाला नाही, तर एसटी कामगारांचेच नुकसान होणार आहे. कोणत्या ही नेत्यांचे नुकसान होणार नाही, असे सांगतानाच बडतर्फीची कारवाई सुरू झाली असून ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
अनिल परब यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. आता बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. ही कारवाई सुरू झाल्यामुळे होणारे नुकसान कोणताही नेता भरून देणार नाही. कर्मचाऱ्यांचे नुकसान स्वत:चे होईल, नेत्याचे होणार नाही. दोन महिने पगार नाही मिळाला तर त्यांचे नुकसान होईल. हे त्यांनी समजून घ्यावे. ४१ टक्के पगार वाढ दिली आहे. ताणून धरू नका. एका शब्दावर आडून बसू नका. जनतेलाही उत्तर द्यायचे आहे. एसटी ही अत्यावश्यक सेवेत आहे. त्यामुळे कामावर या, असे परब म्हणाले.
यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबीसी आरक्षणामुळे सरकार अडचणीत नाही. सरकार सोमवारी ठराव करीत आहे. इम्पेरिकल डेटा होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ नयेत असा ठराव केला जाणार आहे. आमची तीच भूमिका आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अध्यक्षाचे नियम बदलले आहेत. हात उंचावून मतदानाचा नियम पारित झाला आहे. हात वर करून किंवा आवाजी मतदानानेच ही निवडणूक होईल. तसा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. आम्ही राज्यपालांना फाईल पाठवली आहे. २८ डिसेंबरला निवडणूक घ्यायची आहे. आता चेंडू राज्यपालांच्या कोर्टात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा त्यांना कोणतेही समन्स आले नसल्याचे स्पष्ट केले. किरीट सोमय्या सांगत आहेत ते रिसॉर्ट माझे नाही. सातबारा माझ्या नावावर नाही. नोटीसही सदानंद कदम यांच्या नावावर आली आहे. माझ्या नावावर आली नाही. मी कोर्टात सोमय्यांविरोधात मानहानीचा दावा केला आहे. त्यांना एक तर माझी माफी मागावी लागेल किंवा भरपाई द्यावी लागेल, असे ते म्हणाले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …