नवी दिल्ली – देशात कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. त्यातच आलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने चिंतेत भर टाकली आहे. देशात दिवसभरात ६ हजार ८२२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर २२० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे २३ रुग्ण सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ९५ हजार १४ आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख ७३ हजार ७५७ झाली आहे. आकडेवारीनुसार, दिवसभरात १० हजार ४ रुग्ण बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत ३ कोटी ४० लाख ७९ हजार ६१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत कोरोनावरील प्रतिबंधक लसीचे १२८ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. सोमवारी दिवसभरात ७९ लाख ३९ हजार ३८ डोस देण्यात आले. आतापर्यंत १२८ कोटी ७६ लाख १० हजार ५९० लसीचे डोस देण्यात आले आहेत. सोमवारी मुंबईतील दोन लोकांमध्ये ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. दोघेही २५ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून परतले होते आणि त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर विषाणू ओमिक्रॉन आहे की नाही हे तपासण्यासाठी एनआयव्ही, पुणे येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुना पाठवण्यात आला. आता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या ११ झाली आहे. आतापर्यंत देशात २३ जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे.