दिवसभरात २,७९६ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली – देशात कोरोनाची महासाथ आटोक्यात येत असल्याचे वाटत असतानाच दुसरीकडे पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशभरात मागील २४ तासांत ८८९५ कोरोनाबाधित आढळले. धक्कादायक म्हणजे २७९६ जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनाची ३ कोटी ४६ लाख ३३ हजार २५५ प्रकरणे आढळली आहेत. देशभरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत १२७ कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. शनिवारी १ कोटी ४१ लाख ८ हजार ७०७ डोस देण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या कोरोनाचे ९९ हजार १५५ सक्रिय बाधित आहेत. या महासाथीमध्ये प्राण गमावणाºयांची संख्या ४ लाख ७३ हजार ३२६ इतकी झाली आहे, तर मागील २४ तासांत ६९१८ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात दिली. आतापर्यंत ३ कोटी ४६ लाख ६० हजार ७७४ जणांनी कोरोनाला मात दिली आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत १२७ कोटी नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले असताना, हिमाचल प्रदेशच्या नावे एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. राज्यातील सर्व प्रौढ नागरिकांना कोरोनाची लस देणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. राज्यातील सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना सर्वप्रथम पहिला डोस देण्याचा विक्रमही हिमाचल प्रदेशच्या नावेच आहे. राज्यातील एकूण ५३,८६,३९३ प्रौढ नागरिकांना कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. या वर्षाच्या आॅगस्ट महिन्यात हिमाचल प्रदेशने राज्यातील सर्व नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला होता. आता एम्सकडून या राज्याचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.