नवी दिल्ली – देशात गेल्या २४ तासांत १०,५४९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर ४८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या आकडेवारीनंतर कोरोना महामारीपासून आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ४५ लाख ५५,४३१ वर पोहोचली आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या १,१०,१३३ असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ९,८६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ८४८ नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर, ५० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालीय. याशिवाय, ९८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ७९ हजार ३९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६८ टक्क्यांवर पोहचले आहे. राज्यात सध्या ९ हजार १८७ रुग्ण सक्रिय आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण ३ कोटी ३९ लाख ७७,८३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे आतापर्यंत ४ लाख ६७,४६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे जिथे कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे, तर दुसरीकडे देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. गेल्या २४ तासांत ८३ लाख ८८,८२४ रुग्णांचे लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत देशात एकूण १२० कोटी २७ लाख ०३,६५९ लसीकरण पार पडले आहे.