देशात सर्वत्र इंधन दर सारखे असावेत


महाराष्ट्र राज्यातील सर्वात महागडे इंधन हे नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये विकलं जात आहे. धर्माबाद हा तेलंगणा राज्याला लागून असलेला तालुका आहे. आज धर्माबादमध्ये पेट्रोल ज्या दराने ग्राहकांना घ्यावे लागतं आहे. त्याच भागातील मात्र अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यात पेट्रोलचे भाव प्रति लिटर मागे ४ रुपयांनी कमी असतात. त्यामुळे इंधन भरण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जण तेलंगणात ये-जा करतात. हे उदाहरणादाखल सांगितले आहे.

आपल्या देशात आज अशी अनेक ठिकाणे आहेत, जेथे इंधनातील दरात फार मोठी तफावत दिसून येते, धर्माबाद शहराला इंधनाचा पुरवठा हा महाराष्ट्रातील सोलापूर इथल्या आॅइल डेपोतून होतो. धर्माबाद ते सोलापूर हे अंतर तीनशे किलोमीटर आहे. इंधनाच्या वाहतुकीचा खर्च वाढत गेल्याने धर्माबादमध्ये किमतीवर परिणाम होतो. याउलट तेलंगणा राज्यातील इथल्या सीमावर्ती भागाला इंधनाचा पुरवठा हा हैदराबाद डेपोतून होतो.
येथून हैदराबादचे अंतर अवघे दीडशे किलोमीटर आहे. त्यामुळे महाराष्ट्रापेक्षा तेलंगणात इंधनाच्या वाहतुकीचा खर्च कमी होतो. परिणामी महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगणा राज्यात इंधन स्वस्त आहे. सीमावर्ती भागातील नागरिक आपल्या महाराष्ट्रातील महागडे इंधन घेण्यापेक्षा तेलंगणात जाऊन मोठ्या प्रमाणात इंधनाची खरेदी करतात. त्यामुळे धर्माबादचे पेट्रोल पंप हे नेहमीच सुनेसुने दिसतात, तर शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यातील पेट्रोल पंपांवर रांगा लागलेल्या असतात.

आपल्या देशात अनेक जागी धर्माबादसारखीच समस्या आहे. प्रत्येक राज्याची महसूल आणि कर रचना वेगवेगळी आहे. इंधन विक्रीवरचा प्रत्येक राज्याचा वेगवेगळा अधिभार असतो. त्यामुळे आॅइल डेपोपासून अंतर कितीही असू द्या, त्या-त्या राज्यात त्यांच्याच आॅइल डेपोपासून इंधनाचा पुरवठा केला जातो.
पण ग्राहकांना मात्र या सगळ्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यात आर्थिक फटका बसतो तो वेगळाच. आपल्या देशात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे कर आहेत. अशाच प्रकारचे दुसरे उदाहरण देता येईल. केंद्र सरकारनं उत्पादन शुल्कात केलेल्या कपातीनंतर देखील भारत आणि नेपाळच्या सीमेवरील नागरिक पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी थेट नेपाळ गाठत असल्याचं दिसून येतंय.

नेपाळमध्ये पेट्रोल २५ रुपयांनी, तर डिझेल २० रुपयांनी स्वस्त आहे. रक्सौलच्या बाजूलाच असलेल्या नेपाळ हद्दीतील पर्सा जिल्ह्यात एक लीटर पेट्रोलसाठी नागरिकांना १३२.२५ नेपाळी रुपये अर्थात ८२.६५ भारतीय रुपये मोजावे लागत आहेत, तर डिझेलच्या एका लिटरसाठी ११५.२५ नेपाळी रुपये म्हणजे ७२.०३ भारतीय रुपये मोजावे लागत आहेत. बिहार आणि नेपाळच्या सीमावर्तीय भागांत व्यवहारिकरित्या नेपाळी चलन मोठ्या प्रमाणात वापरलं जात असल्याने नागरिक सर्रासपणे इंधन भरण्यासाठी या देशातून त्या देशात जातात. सदरचा विरोधाभास टाळण्यासाठी व राज्यांचा महसूल बुडू नये यासाठी एक देश एकच दर योजना राबविणे आवश्यक आहे.
– बाळासाहेब हांडे/९५९४४४५२२२\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …